Nashik Surgana Earthquake : सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंप सदृश हादरे, नागरिक भयभीत, प्रशासनाकडून पाहणी
Nashik Surgana Earthquake : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा तालुका (Surgana Taluka) पुन्हा एकदा हादरला असून मागील वर्षी सौम्य हादरे बसल्याची पुनरावृत्ती होत आहे.
Nashik Surgana Earthquake : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा तालुका (Surgana Taluka) पुन्हा एकदा हादरला असून अलंगुनची घटना ताजी असतानाच आता मागील वर्षीच्या सौम्य हादरे बसल्याची पुनरावृत्ती होत आहे. यंदाही तालुक्यातील खोकरविहीर (Khokarvihir) परिसरात भूकंप सदृश्य हादरे (Earthquake) बसल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.
जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, अनेक पूल पाण्यात जाऊन संपर्कही तुटला होता. शिवाय अलंगुन येथील तलावाचा सांडवा फुटल्याने अतोनात नुकसान झाले. येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे सुरगाणा अतिवृष्टीतून सावरत असताना आता खोकर विहिर या गावाला भूकंप सदृश्य हादरे बसले आहेत. खोकरविहर, चि-याचापाडा या गावात दोन दिवसांपासून भूकंप सदृश हादरे बसत असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान स्फोटाचा आवाज होतो तसा मोठा आवाज झाला होता. तर जेवणाला बसले असताना अचानक आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
दरम्यान मागील वर्षी दिवाळीच्या सुमारास देखील खोकरविहीर परिसरात अशाच पद्धतीने भूकंप सदृश्य हादरे बसले होते. त्यावेळी देखील येथील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत्या. यंदाही दिल्या दोन दिवसांपासून हादरे बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच मागील वर्षीपेक्षा यंदा हादरे बसण्याची तीव्रता वाढल्याचे देखील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तसेच दोन वर्षांपूर्वी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर चामोलीचा माळ येथील जमीनीला दोनशे ते अडीचशे फुटा पर्यंत उभी भेग (चीर) पडून जमीन खचली होती. याबाबत नेमके काय हा प्रकार आहे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी एकनाथ गांगोडे, देविदास पाडवी, निवृती बा-हे, नामदेव जाधव, गंगाराम बा-हे, गंगाराम गांगोडे , मधुकर वार्डे, एकनाथ बा-हे, जानकी बा-हे, योगीराज गवळी, यांनी केली आहे. याबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खोकर विहीर येथील खंडू वाघमारे हा युवा तरुण म्हणाला कि, मागील दोन दिवसांपासून आवाज येत आहेत. रविवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास मोठा आवाज झाला. सदर आवाज हा जमीनीतून येत असून अचानक आवाज झाल्याने गावातील अनेक नागरिक रात्री उठून बसले. मात्र परिसरातील इतर नागरिकांशी संपर्क साधला असता अशाप्रकारे आवाज आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमका हा आवाज का येतो? याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने दुर करावी.
सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार याबाबत म्हणाले कि, यापूर्वी देखील अशा पद्धतीचे भूकंप सदृश्य हादरे सदर गावाला बसले आहेत. रविवारच्या घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यांनतर आमचे पथक घटनास्थळी पाठविले आहे. मात्र रिश्टर स्केलवर नोंदविण्यासारखे हादरे नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सध्या पथक संबंधित ठिकाणी तपासणी करत असून याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.