(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dada Bhuse : "शिवसैनिकांचा अन् सत्याचा विजय, साक्षात प्रभू रामचद्रांनी आशीर्वाद दिला"; आमदार अपात्रता निकालानंतर दादा भूसेंचे वक्तव्य
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता निकालावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
MLA Disqualification Case Dada Bhuse नाशिक : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस ठरला. संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा (MLA Disqualification Case) निकाल नुकताच जाहीर केला. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना आमदार अपात्रता निकालावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज साक्षात प्रभू रामचद्रांनी आशीर्वाद दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले दादा भुसे?
आजचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिक्कमोर्तब असून, शिवसैनिकांचा आणि सत्याचा विजय आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व शिवसैनिक जोमाने कामाला लागू. सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आम्हाला असल्याने साक्षात प्रभू रामचद्रांनी आज हा आशीर्वाद आम्हा शिवसैनिकांना दिला आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले आहे. येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा ओघ दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
असा आहे निकाल
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय.
शिंदे सरकारला धोका नाही
खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.
आणखी वाचा