(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांची नांदूर-मध्यमेश्वरच्या सरपंच,उपसरपंचांची विधानसभा अध्यक्षाकडं तक्रार, मतदारसंघातल्या अंगणवाडीच्या कार्यक्रमातून डावलल्यानं भुजबळ संतापले...
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्याकडून ग्रामपंचायत नांदूर माध्यमेश्वर तसेच सरपंच उपसरपंच माजी जिल्हा परिषद नाशिक व जिल्हा परिषद प्रशासन नाशिक यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार देण्यात आली आहे.
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून ग्रामपंचायत नांदूर माध्यमेश्वर तसेच सरपंच उपसरपंच माजी जिल्हा परिषद नाशिक व जिल्हा परिषद प्रशासन नाशिक यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार देण्यात आली आहे. 29 जुलै रोजी ग्रामपंचायत नांदूर मध्यमेश्वर येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून देखील बोलवण्यात आलं नाही. तसेच या सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, सुरेखा नरेंद्र दराडे तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्रमाला न बोलवून जाणीवपूर्वक अवमान केल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षाकडं करण्यात आली आहे. पत्राद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा कोण शिलेवर जिल्हा परिषद सदस्य असा उल्लेख यासारख्या अनेक गंभीर बाबी जिल्हा परिषदेच्या वतीने केल्यामुळे तत्काळ यांच्या विरोधात कारवाई करण्याची छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मागणी केली आहे.
तक्रारीत छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय?
मी महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ अन्वये सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर व जबाबदार जिल्हा परिषद प्रशासन तसेच माजी जि.प.सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांचे विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना देत आहे.
दि. २९ जुलै २०२४ रोजी ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर ता. निफाड येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नांदूरमध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक, (बांधकाम खर्च रु.६० लक्ष) या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. तसेच याच दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार यांच्या हस्ते एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.
मी या क्षेत्राचा विधानसभा सदस्य असून या कार्यक्रमासाठी मला जिल्हा परिषद, नाशिक प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही सूचना दिलेली नाही वा मला आमंत्रित केलेले नाही. या बाबतीत मी जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांना सूचना देऊन विचारणा केली. परंतु वरील पैकी कोणीही सदर प्रकरणी हस्तक्षेप करून चूक सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
तसेच श्रीमती अमृता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्य असून कोनशिलेवर त्यांचा उल्लेख जिल्हा परिषद, सदस्य, नाशिक असा करण्यात आला आहे. हि बाब देखील नियमांस अनुसरून नाही. या संदर्भात मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे. सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर, माजी जि.प. सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांनी शासकीय निधीतून बांधकाम केलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या लोकार्पण व उदघाटन सोहळ्यास स्थानिक विधानसभा सदस्यास डावलून विधानमंडळ सदस्यांचा पर्यायाने विधानसभेसारख्या सार्वभौम व सर्वोच्च संस्थेचा जाणीवपूर्वक अवमान व विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी विशेषाधिकार भंग समितीकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी आपणांस विनंती आहे.