Nashik Loksabha : आता पूर्ण ताकदीने लढायचं! नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Nashik Loksabha : नाशिक लोकसभेची उमेदवारी छगन भुजबळांना मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. यावर छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेचा (Nashik Lok Sabha Constituency ) तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. या जागेवर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारी आधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. नाशिक लोकसभेची उमेदवारी छगन भुजबळांना मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत ज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी येवल्यात नाशिक लोकसभेबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, पक्षाने एकदा सांगितले, युतीने एकदा सांगितले की तुम्हाला उभं राहायचंय. मी दोन दिवस सांगितले की मला नाही उभे राहायचे. पण दिल्लीला जी महायुतीची बैठक झाली त्या मिटिंगमध्ये माझे नाव ठरल्याचे मला सांगण्यात आले. ते मी देवेंद्र फडणवीसांकडून कन्फर्म केले. ते म्हणाले हो हे खरे आहे.
आता पूर्ण ताकदीने लढावे लागणार
ज्या वेळी पक्षाला आणि युतीला आपली गरज असते त्यावेळी नाही म्हणणे योग्य नाही. ते चॅलेंज आपण स्वीकारले पाहिजे. त्यात आपल्या मनाचा प्रश्न येत नाही. आपला आग्रह नाही पण सगळ्यांनी ठरवलंय करायचंय, त्यामुळे आपण पुन्हा मागे येणे बरोबर नाही. आता पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे, असे भुजबळांनी म्हटले आहे.
माझं आणि येवल्याचं नातं अतूट
ते पुढे म्हणाले की, अजून काहीही नक्की झालेले नाही. मी काही स्वतःचा आग्रह धरलेला नाही. ज्यावेळी जाहीर होईल. त्यावेळी आम्ही चर्चा करू, एकत्र बसू आणि सगळ्यांची समजूतही काढू. शेवटी मी कुठेही गेलो तरी येवल्याच्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केलंय ते मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. त्यामुळे मी एखाद्या पदावर असलो काय आणि नसलो काय, माझं आणि येवल्याचं नातं अतूट झालेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाजपवरील टीकेचा भुजबळांकडून समाचार
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या (India Aghadi) मेळाव्यात भाजप अबकी बार चारसो पार नही, अबकी बार तडीपार अशी खिल्ली उडवली होती. यावरून छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, या घोषणा असतात, निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या घोषणा लोकं देत असतात. काही लोकांना टाळ्या घायच्या असतात. म्हणून सुद्धा काही घोषणा बोलायच्या असतात, असा टोला छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
भुजबळांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
तसेच प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांच्यावर भाजप नेत्यांशी छुपा संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे मंत्री छगन भुजबळांनी खंडन केले आहे. आरोपचे खंडन देखील भुजबळ यांनी केले. छगन भुजबळ म्हणाले की, तशी माहिती असू प्रकाश आंबेडकरांची शकते. मला असे काही असेल असे वाटत नाही. त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील. असे पण आपण एकमेकांची बोलतच असतो. कुठल्याही पक्षात असलो तर आपण एकमेकांशी बोलतच असतो, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा