Nashik Loksabha : छगन भुजबळांना लोकसभा निवडणुकीत मराठा समाज घाम फोडणार? मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर इशारा!
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्यांना मराठा क्रांती मोर्चा पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय.
Maratha Kranti Morcha : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारी जाहीर करण्याआधीच लोकसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या उमेदवारीवरून मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) त्यांना इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्यांना मराठा क्रांती मोर्चा पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार महायुतीचा अजून जाहीर होईना. त्यामुळे राज्यातील मोजक्या मतदारसंघांमध्ये नाशिकचे नावदेखील सहभागी झाले आहे की, ज्या जागेबाबत अद्याप काही निर्णय होत नाही.
तीनही पक्षाकडून नाशिकच्या जागेवर दावा
महायुतीकडून प्रारंभी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर मनसे नेते आणि भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर नाशिकमधून मनसेचा उमेदवार असेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु छगन भुजबळ उमेदवार असतील, अशी चर्चा अशी सुरू झाली आहे. तर नाशिकमध्ये तिन्ही आमदार भाजपचे (BJP) आहेत. महापालिकादेखील भाजपच्या ताब्यात होती. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी, अशी भाजप पदाधिकारी सातत्याने मागणी करत आहेत.
करण गायकरांचा भुजबळांवर आरोप
हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन-तीन वेळा जोरदार लॉबिंगही केले. नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंची उमेदवारीदेखील जाहीर केली होती. परंतु अद्यापही नाशिकच्या जागेबाबत भिजते घोंगडे कायम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमधून भुजबळ निवडणुकीला सामोरे जातील ही चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाला आणि विशेषतः जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांनी अनेक बाबींमध्ये अडचणीत आणल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केला.
...तर भुजबळांना उमेदवारी का देताय?
खासदार गोडसे जर कार्यसम्राट आहेत, तर भुजबळांना का उमेदवारी देत आहात? भुजबळांच्या उमेदवारीमागे भाजप शिंदे गट शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी या सगळ्यांचा हात असल्याचा थेट आरोपही गायकर यांनी केला. छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाचा रोष हे तिन्ही पक्ष स्वतःवर ओढून घेत आहेत. मराठा समाजात भुजबळांविषयी प्रचंड रोष असताना भुजबळ यांच्या उमेदवारीचा हट्ट जर धरला तर भुजबळ यांना पराभूत करणारच, असा इशाराही त्यांनी दिला.
आणखी वाचा