Nashik Graduate Constituency : शुभांगी पाटलांचं त्र्यंबक राजाला साकडं तर सत्यजीत तांबेचे विजयी बॅनरही झळकले!
Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरु आहे.
Nashik Graduate Constituency : एकीकडे नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरू आहे. अशातच शुभांगी पाटील या त्र्यंबकेश्वरला देव दर्शनासाठी गेल्या आहेत. तर इकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयी अभिनंदनाचे बॅनरही झळकू लागले आहेत.
नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, या निवडणुकीत नेमका कुणाचा विजय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्रंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे शुभांगी पाटील यांनी त्रंबक राजाचे मनोभावे दर्शन घेऊन आपलाच विजय होण्याची प्रार्थना केली. तसेच त्यांच्या मातोश्री आणि काकू यांनी देखील त्र्यंबक राजाला विजयासाठी साकडे घातले.
तर दुसरीकडे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली असून फ्लेक्सवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून अशातच निकालापूर्वीच संगमनेर शहरातही फ्लेक्स लागले आहे. सत्यजित तांबे यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली आहे. 'आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन.. या आशयाचे अनेक फ्लेक्स संगमनेर शहरात लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातही विजयी अभिनंदनाचे पोस्टर झळकत आहेत. यात 'जीत सत्याची विजय नव्या पर्वाचा' असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतानी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांचे हार्दिक अभिनंदन, असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहे.
मतमोजणीला सुरुवात...
दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून 28 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली असून एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल. या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित राहतील. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल. तसेच सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील. नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सुरुवातीला मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा काढण्यात येईल.