Nashik Police : गुन्हेगारांची खैर नाही, नाशिक ग्रामीण पोलीस दल झालं हायटेक, मिनिटात पोलीस पोहचणार
Nashik Police : आपले पोलीस या संकल्पनेतून नाशिक (Nashik) ग्रामीण पोलीस दलात 20 चारचाकी महिंद्रा बोलरो जीप वाहने दाखल झाली आहेत.
Nashik Police : नाशिक शहर पोलिसांना (Nashik City Police) काही दिवसांपूर्वी एक कोटी रुपयांची नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यातही नव्याने 21 बोलेरो जीप दाखल झाल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांचा गुन्हेगारीचा रोखण्याचा आलेख वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल गतिमान झालं आहे.
दरम्यान आपले पोलीस या संकल्पनेतून नाशिक (Nashik) ग्रामीण पोलीस दलात 20 चारचाकी महिंद्रा बोलरो जीप वाहने दाखल झाली आहेत. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधून सदर लोकार्पण सोहळा पार पडला. नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण 40 पोलीस स्टेशन, 08 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, तर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव (Malegaon) विभाग अशी एकूण 50 कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे 15 हजार चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीसांकडे वाहनांची कमतरता भासत होती. उपलब्ध असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर निकामी झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. अलीकडील कालावधीत नागरिकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल 112 ही योजना कार्यन्वीत करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत अडचणीत असलेल्या नागरीकांच्या तक्रारींची माहीती शीघ्रतेने त्या त्या जिल्हयांच्या नियंत्रण कक्षात थेट पुरवली जाते. सदर माहीती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाल्यानंतर अशी माहीती अगदी कमी कालावधीत संबंधीत कॉल करणा-या व्यक्तीच्या अधिक जवळ असणा-या वाहनास पुरवली जाते.
नागरीकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेवून निरसन होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असणारी गरज आणखी वाढली होती. सदरची बाब लक्षात घेवून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वाहनांबाबतची मागणी जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असलेली निकडीची गरज लक्षात घेवून पालकमंत्री दादा भुसे यांनी सदर कामास प्राधान्याने मंजुरी देत सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने नाशिक ग्रामीण पोलीस दलास सदर 20 महिंद्रा बोलेरो वाहने प्राप्त झाली आहे.
पोलिस ठाण्यांची अडचण सुटणार
सदर नवीन व सुसज्ज वाहनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक ग्रामीण पोलीसांना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था प्रश्न, रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदी, गुन्हे तपास याबरोबरच डायल 112 योजने अंतर्गत आलेल्या तक्रारींवर शीघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ज्या पोलिस ठाण्यांकडे वाहनांची संख्या अपुरी आहे. त्यांना प्राधान्य क्रमाने वाहने दिली जाणार असल्याचे समजते.