(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nylon Manja : गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची मिळाली माहिती; पोलिसांनी सापळा रचत ठोकल्या बेड्या, ७० गट्टू जप्त
Nashik Crime News : नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत.
Nylon Manja नाशिक : नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 28 हजार रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत.
मकर संक्रांतीला (Makar Sankrant) पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा असतो. यामुळे पक्षी, प्राणी, नागरिक अनेकदा जखमी होतात. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे गेल्या काही दिवसांत दुचाकीस्वार व सायकलवरील विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मंजामुळे मृत्यूदेखील झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Nashik City Police Commissioner Sandeep Karnik) यांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरावर बंदी घालण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी जारी केला आहे.
गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री
पोलिसांनी (Nashik Police) दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार मते यांना गोपनिय बातमीदारकडुन बातमी मिळाली की, अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ केवलपार्करोड, या ठिकाणी एक व्यक्ती गोणीमधून नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री करत आहे.
70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Police) सापळा रचून संशयित आरोपी प्रथमेश काळे, (21 ,रा अंबड लिंक रोड) यास ताब्यात घेतले. संशयिताकडून 28 हजार रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (Pramod Wagh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख, सचिन करंजे, प्रवीण राठोड , समाधान शिंदे,अनिल गाढवे राकेश पाटील यांच्या पथकाने केली.
नाशिक पोलिसांचा मनाई आदेश
दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime News : नाशकात घरफोड्यांचे सत्र संपेना! चार घटनांमध्ये सात लाख लंपास