Nashik Crime News : नाशकात घरफोड्यांचे सत्र संपेना! चार घटनांमध्ये सात लाख लंपास
Nashik Crime News : शहरातील घरफोड्यांचे सत्र काही थांबत नाहीये. नाशिकमध्ये चार घरफोड्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. यात सुमारे सात लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.
Nashik Crime News नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वीच शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीसाठी उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा घरफोड्या (Robbery) करणाऱ्या दोन उच्चशिक्षितांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र शहरातील घरफोड्यांचे सत्र काही थांबत नाहीये. आता नाशिक शहरात चार घरफोड्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. यात सुमारे सात लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.
इंदिरानगर (Indiranagar) परिसरात दोन, अशोका मार्गावर (Ashoka Marg) एक, जुने सिडकोतील शिवाजीनगर (Shivajinagar Old Cidco) परिसरात एक अशा एकूण चार घरफोड्या (Robbery) नाशिक शहरात झाल्या आहेत. शहरातील वाढत्या घरफोड्यांना रोखणे हे नाशिक शहर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
इंदिरानगरमध्ये दोन घरफोड्या
पहिली घटना ही इंदिरानगर येथील राजीव नगर परिसरात घडली. बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून घरातून 1 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरट्यांनी पळवून नेली आहे. रमेश नारायण येवले (रा. स्नेहल बंगला, राजीवनगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. येवले यांचा बंगला 30 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान बंद होता. या काळातच अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंगल्यात घरफोडी केली आहे.
दुसरी घटना ही आयटीआय कॉलनीत घडली आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 76 हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मिलिंद प्रभाकर कुसमोडे (रा. विश्वास सोसायटी, आयटीआय कॉलनीसमोर, इंदिरानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. इंदिरानगर पोलिसात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अशोका मार्गावर भरदिवसा घरफोडी
तिसरी घटना अशोका मार्ग परिसरातील कल्पतरु नगरमध्ये घडली आहे. बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोकड, असा 3 लाख 23 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरला आहे. अरुण लक्ष्मण कपिले (रा. प्रल्हाद आर्केड, कल्पतरु नगर) यांनी याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी भरदिवसा दुपारी दीडच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगरमध्ये दीड लाखांची घरफोडी
चौथी घटना ही जुने सिडकोतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 50 हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याचे भूषण भगवान भामरे (रा. शनि मंदिरामागे, शिवाजी चौक, जुने सिडको) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा