राज्य सरकारकडून कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना; पण कुशावर्त तीर्थाचा तिढा अद्याप जैसे थे! साधू महंतांना स्थान न दिल्याने नाराजीचा सुर
Nashik Kumbh Mela: नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळासाठी राज्य सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मात्र साधू महंताना प्राधिकरणात स्थान दिले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Nashik Kumbh Mela: नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळासाठी राज्य सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्याचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे. मात्र साधू महंताना प्राधिकरणात स्थान दिले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा बैठक होऊन 10 दिवस उलटून गेलेत तरीही एकही काम सुरू झालेले दिसत नाही. साधुग्रामच्या जागेचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. साधूंना राहण्यासाठी शेकडो एकर जागेची आवश्यकता असताना प्रशासनाकडे केवळ 25 एकर जागा उपलब्ध आहे.
तसेच, कुशावर्त तीर्थाचा तिढा सोडविण्यातही सरकारला अद्याप यश आलेले नाही. यंदाच्या कुंभमेळाच्या गर्दीत वाढ होणार असल्याने शाही स्नानासाठी कुशावर्त तीर्थाची जागा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शहराबाहेर दुसरे प्रति कुशावर्त तीर्थ उभारून तिथे आखाड्याच्या साधुचं स्नान करण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता, मात्र त्यावरही अजून एकमत नाही. दहा पैकी पाच आखाडयांनी नवीन घाटावर स्नानासाठी सहमती दर्शविली आहे. तर पाच आखाडयांनी विरोध केला असल्यानं प्रशासना समोर पेच निर्माण झाला असून लवकरात लवकर जे सर्व प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.
यांच्यावर असेल कुंभमेळाव्याच्या नियोजन जवाबदारी
कुंभमेळा प्राधिकरणाचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम अध्यक्ष आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक प्राधिकरणाचे उपाध्यक्ष असणार आहेत. तर जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका आयुक्त असे विविध विभागाचे प्रमुख पदसिद्ध सदस्य असून यांच्या माध्यमातून कुंभमेळाचे नियोजन केले जाणार आहे.
कुशावर्त तिर्थाबाबत मुख्यमंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय?
कुशावर्त तिर्थाची पाहणी करून आपण तेथील पाण्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील काळातच मी काही तज्ञांची टीम तिथे पाठवली होती. त्यांनी आम्हाला याबाबत उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्यांनी ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहेत, त्यावर आम्ही निर्णय करत आहोत. त्यांचा असा दावा आहे की तेथील पाणी ते स्वच्छ करू शकतात. त्यामुळे त्यातला जो उत्तम पर्याय असेल तो आम्ही स्वीकारून तत्काळ कार्यवाही करू, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, त्र्यंबकच्या साधू संतांनी अशी मागणी केली आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कुंभमेळ्याची जबाबदारी घ्यावी, असे विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच. पण, आपण आता उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केलं. त्याच धर्तीवर आपण देखील कायदा तयार करत आहोत. आपणही कुंभमेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर चौकट देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा





















