Nandurbar News : वडिलांचं निधन झालं, आई सोडून गेली; मात्र 'ती' डगमगली नाही, तेरा वर्षीय रोशनीची संघर्षगाथा
Nandurbar News : आयुष्यात संघर्ष कुणालाही चुकलेला नाही, मात्र अनेकदा मोठ्यांना देखील लहान वयातील संघर्ष प्रेरणा देऊन जात असतो.
Nandurbar News : संघर्ष काय असतो, हे परिस्थिती अनुभवल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे अनेकदा आयुष्यात संकट येतात. मात्र त्यावर खंबीरपणे मत करून आयुष्यात यशस्वी झालेली माणस क्वचितच असतात. अशीच एक संघर्षमय कहाणी सांगणारी रोशनी. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आई ही सोडून गेली. घरी असलेल्या वयोवृद्ध आजी आणि दोन भावंडांची जबाबदारी तेरा वर्षीय रोशनी नित्यनेमाने पार पाडते आहे. खऱ्या अर्थाने या रोशनीची संघर्षगाथा समजून घेणं गरजेचे आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरातील मेहतर वस्ती परिसरात राहणारी तेरा वर्षीय रोशनी भिल (Roshni Bhil). या चिमुकल्या मुलीचे आई-वडील दोन वर्षांपूर्वी गेले. त्यानंतर घरातील सर्व जबाबदारी रोशनीवर आली असून दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करत घरातील तिघांची जबाबदारी सांभाळत आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. घरात वयोवृद्ध आजी आणि दोन भावंडांचा सांभाळ करीत तिने जीवनाला नवा मार्ग दिला आहे. दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे वडिलांचे निधन झाले, त्यानंतर आईने घर सोडून दिल्याने आजीसह रोशनी आणि दोन भावंडं एकटी पडली. रोशनी मोठी असल्याने तिने घराची जबाबदारी उचलली. मात्र शिक्षणात कुठेही खंड पडू न देता ती आज घरातली सगळी कामे करून शिक्षण करत आहे.
रोशनी भील ही तेरा वर्षीय मुलगी असून सद्यस्थितीत घरात कमवते कोणी नाही. शिवाय उतार वयात आजी कडूनही काम होत नाही. त्यात रोशनीने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आणि ती आपल्या आजी सोबत धुणं भांड्याच्या कामाला जाऊ लागली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंब चालवत आहे. त्याचबरोबर काम करून आल्यानंतर ती उर्वरित काळात शाळेत जात आहे. लहान वयात सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण घेणारे रोशनी शिक्षणातही हुशार आहे. शाळेतील सर्वच अभ्यासक्रमात ती अव्वल असून तिला सामाजिक क्षेत्रातील दात्यांनी शैक्षणिक मदत करावी अशी अपेक्षा वर्ग शिक्षकांनी व्यक्त केले.
वर्गशिक्षक विठ्ठल मराठे म्हणाले की, रोशनी ही इयत्ता सातवीत शिकत असून अत्यंत हुशार मुलगी आहे. वडिल वारल्यानंतर तिची एक लहान बहिण, एक भाऊ वयस्कर आजीला सांभाळून ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे घरातल्या स्वयंपाक असो की इतर कामे ती स्वतःकरून पुन्हा दुसऱ्याच्या घरी कामाला जात असते. त्यानंतर ती शाळेलाही हजर असते. रोशनीला एक चांगल्या पद्धतीचे पाठबळ मिळालं तर नक्कीच या विद्यार्थीनीला शिक्षणाची चांगली संधी मिळू शकते. आम्ही देखील मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पालक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसल्याचे या चिमुरडीकडे पाहिल्यानंतर लक्षात येत. कमी वयात रोशनीचा कुटुंब सांभाळण्याचा अनुभव आणि त्यातच शिक्षणाची जिद्द हे सगळं प्रेरणा देणारे आहे.