फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
Dhananjay Munde Meet CM Devendra Fadnavis : एकीकडे संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Dhananjay Munde Meet CM Devendra Fadnavis : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात केला जात आहे. तर वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला असतानाचा धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे. देशमुख यांच्या हत्यानंतर बारा दिवसांनी सीआयडीकडे तपास देण्यात आला. आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलिसांच्या विशेष पथकाकडून केला जातोय. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर ते केज कडे रवाना झाले असून केज शासकीय विश्रामगृहात येऊन थांबले आहेत.
धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला
तर दुसरीकडे बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. खुद्द संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत वारंवार भूमिका मांडली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला धनंजय मुंडे मदत करत असल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यामुळे धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे : धनंजय मुंडे
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे म्हणाले की, वाल्मीक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी होती. ते माझ्या जवळचे आहेत. गुन्हा दाखल झालाय, त्याची चौकशी पोलीस करत आहे. अतिशय पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. शासन कोणालाही पाठीशी घालत नाही. पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजाडत नसेल तर आपण काही बोलू शकत नाही. माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, हे प्रकरण भयंकर आहे. त्याचा तपास फास्टट्रॅक वर चालला पाहिजे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले.