Nanded: धरणांतून दररोज एक दलघमी पाणी होतेय कमी, आठवड्यात तब्बल साडेआठ दलघमी पाण्याची घट
Nanded News : ही घट अशीच वाढत राहिली तर पाणी टंचाईचे चटके ही वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
Nanded News : उन्हाचा चटका वाढत असताना धरणांमध्ये (Dam) असलेल्या पाणी साठ्याच्या (Water Storage) बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. बाष्पीभवन आणि होणारा वापर यामुळे दररोज सरासरी एक दलघमी पाणी कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) धरणातील साठ्यामध्ये आठवडाभरात 8.58 दलघमी पाणी कमी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. ही घट अशीच वाढत राहिली तर पाणी टंचाईचे चटके ही वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 244 दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, क्षमतेच्या तुलनेत केवळ 33 टक्के पाणी उरले आहे. त्यामुळे हे पाणी जपून वापरावे लागणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात जून महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. विष्णूपुरी, मानार या प्रकल्पांबरोबरच बंधाऱ्यांत ही पाण्याची घट वेगाने होत आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर गावकऱ्यांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन फिरण्याची वेळ येऊ शकते. सध्या केवळ 33 दलघमी पाणी शिल्लक आहे. सगळ्याच प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे.
चिंता वाढली...
उन्हाचा चटका वाढत असल्याने प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यातच यंदा पाऊस कमी असणार असून, त्यातल्या त्यात जून महिन्यात देखील पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून देखील तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीत नागरिकांनी देखील पाण्याची बचत केली पाहिजे.
जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाई...
नांदेड जिल्ह्यात मे महिन्यातच काही भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तर काही भागात लोकांना खाजगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. अशात जून महिन्यात पाऊस उशिरा किंवा कमी झाल्यास आणखी एक महिना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सद्या तरी नागरिकांनी पुढील परिस्थितीताचा अंदाज घेत पाण्याची बचत करण्याची गरज आहे.
सद्या शिल्लक पाणीसाठा
अ.क्र. | प्रकल्पाचे नाव | पाणीसाठा |
1 | मानार | 49.18 दलघमी |
2 | विष्णुपुरी | 48.45 दलघमी |
3 | मध्यम | 37.77 दलघमी |
4 | उच्च पातळी | 69.31 दलघमी |
5 | लघु प्रकल्प | 37.74 दलघमी |
6 | कोल्हापुरी बंधारे | 0.79 दलघमी |
कोणत्या प्रकल्पात किती पाण्याची घट?
अ.क्र. | प्रकल्पाचे नाव | पाणीसाठा |
1 | मानार | 02.02 |
2 | विष्णुपुरी | 04.09 |
3 | उच्च पातळी | 0.11 |
4 | लघु प्रकल्प | 0.62 |
5 | एकूण घट | 08.58 |
इतर महत्वाच्या बातम्या:
परभणी जिल्ह्यातील तीन तलाव कोरडेठाक, नऊ तलाव जोत्याखाली; पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल