![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded: नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात; पोलीस विभाग अलर्ट
Nanded Police Bharti: संबधित उमेदवारास भरती प्रमुखाकडे हजर करण्यात आले असता, त्याला भरती प्रक्रियेमधुन अपात्र ठरवण्यात आले आहे.
![Nanded: नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात; पोलीस विभाग अलर्ट maharashtra News Nanded News Candidate who took stimulant injection in police recruitment in Nanded detained Police Department Alert Nanded: नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात; पोलीस विभाग अलर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/576de613d1046c490b026095001fd9701673091220529443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Police Bharti: सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या एका कारवाईनंतर कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांकडून मेफेन टरमाईनचं सेवन करण्यात आल्याचे बोलले जात असतानाच, नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजीत इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात घेण्यात आला आहे. मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन देखील या उमेदवाराकडे सापडलं आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. तर नांदेड पोलिसांकडून याप्रकरणी संबधित तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.
सद्या राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रकिया सुरु आहे. दरम्यान नांदेड पोलीस दलात देखील 185 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी रोज सकाळी पाच वाजेपासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे ही प्रक्रिया सुरु होते. दरम्यान आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उमेदवाराचे अर्ज छाननी करून कागदपत्र तपासुन पुढील भरती प्रक्रिया करीता बायो मॅट्रीक चाचणी पूर्ण करून उमेदवारांना मुख्य ग्राऊंड मध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरु होती. या दरम्यान एक उमेदवार लघुशंकेचे कारण सांगत बाथरूमकडे गेला. मात्र त्याच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला.
अन् रंगेहाथ पकडलं...
भरती प्रक्रिया सुरु असतानाच अचानक लघुशंकेचे कारण सांगून हा तरुण बाजूला गेल्याने तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक डाकेवाड आणि इतर अंमलदार यांना तरुणावर संशय आला. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ 1 इंजेक्शनची सिरींज आढळून आली. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, ऑक्सीबुस्टर नावाचे उत्तेजित करणारे हे औषध असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेता येत नाही. तर संबधित उमेदवारास भरती प्रमुखाकडे हजर करण्यात आले. भरती कमिटीने त्याला भरती प्रक्रियेमधून अपात्र ठरवले असून, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस विभाग सतर्क...
दरम्यान या घटने नंतर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीस येते वेळेस कोणतेही संशयास्पद, उत्तेजक द्रव्य घेऊ नये किंवा सोबत बाळगू नये. या घटने नंतर पोलीस विभागाने सतर्कता बाळगत सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक व मॅन्युअली तपासणी करून पुढील भरती प्रक्रियामध्ये उमेदवारांना सोडण्यात येत आहे. अचानकपणे कोणत्याही उमेदवारांचे रक्ताचे नमुने, लघवीचे नमूने घेण्यात येत असून त्यांच्या रक्त किंवा लघवीच्या नमुन्यामध्ये कांही संशयित घटक आढळून आल्यास त्या उमेदवारास पोलीस भरती करीता अपात्र ठरविण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलेय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)