Nanded News : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नांदेडच्या तब्बल 1382 जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द
Nanded News : जिल्ह्यातील एकूण 1 हजार 382 उमेदवारांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
Nanded News : नांदेड जिल्ह्याचे (Nanded District) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचा आदेश काढला आहे. आरक्षित जागेतून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील अशा एकूण 1 हजार 382 उमेदवारांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.
उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्यामुळे या उमेदवारांना संधी देऊनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करु न शकल्यामुळे अशा नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 382 उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी पार पडली होती. तर माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 17 जानेवारी 20223 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली होती. मात्र असे असताना नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 382 उमेदवारांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नव्हते.
तालुकानिहाय ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द संख्या
नांदेड 15, अर्धापूर 54, भोकर 138, मुदखेड 53, हदगाव 108, हिमायतनगर 70, किनवट 34, माहूर 19, धर्माबाद 99, उमरी 142, बिलोली 61, नायगांव 112, देगलूर 121, मुखेड 139, कंधार 91, लोहा 127 अशी एकूण 1 हजार 383 अनर्ह उमेदवार आहेत.
एकट्या मुखेड तालुक्यातील एकूण 139 उमेदवारांचे सदस्यत्व रद्द
दरम्यान एकट्या मुखेड तालुक्यातील एकूण 62 ग्रामपंचायतींच्या एकूण 139 सदस्यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. एकूण 62 ग्रामपंचायतींच्या 139 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यामध्ये 9 सरपंच पैकी 8 महिला सरपंच असून, 2 उपसरपंच महिला आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीआरएस पक्षाची नांदेडमध्ये राज्यस्तरीय बैठक, विधानसभा निवडणुकीवर होणार चर्चा