पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची आढावा बैठक
Girish Mahajan : भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल अशा सूचना गिरीश महाजन यांनी केले.

Nanded News : जागतिक हवामानातील बदल आणि त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही. हवामान तज्ञांनी अलनिनो आणि इतर घटकांमुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण कमी अशी स्थिती दर्शविली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल अशा सूचना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समिती, खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष आढावा बैठकीत ते बोलत होते.
तर खरीप हंगामाचे नियोजन करतांना प्रशासकीय पातळीवर शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. तथापि शेतकऱ्यांनीही पुरेशा पाऊस जोपर्यंत होत नाही तो पर्यंत पेरणीच्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कृषि तज्ज्ञ आणि कृषि विभाग वेळोवेळी ज्या काही सूचना देतील त्याचे पालन करून खरीप हंगामाचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांच्या नावाखाली चुकीचे, उगवण क्षमता कमी असलेले बियाणे दिली जातात. यात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ही मोठ्या आर्थीक हानीची होऊ शकते. यासाठी कृषि विभागाने बियाणे विक्री होत असतांना बाजारपेठांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देशही महाजन यांनी कृषि विभागाला दिले.
नांदेड जिल्ह्यातील खरीप पेरणी प्रस्तावित आराखडा...
जिल्ह्यात खरीप ज्वारीची गतवर्षी 18 हजार 959 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मका पिकाची गतवर्षी 537 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तूर यावर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्र, मुग 27 हजार हेक्टर क्षेत्र, उडीद 27 हजार हेक्टर क्षेत्र, सोयाबीन 4 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र, कापूस 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र असे एकुण 7 लाख 74 हजार 519 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यासमवेत ऊस 32 हजार हेक्टर क्षेत्र, हळद 20 हजार हेक्टर, केळी 6 हजार हेक्टर, इतर भाजीपाला आणि फळपिके 6 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून 2023 मध्ये हे एकुण क्षेत्र 8 लाख 38 हजार 519 हेक्टर एवढे राहिल. यावर्षी सर्वाधिक प्रस्तावित क्षेत्र हे सोयाबीनचे असून याची टक्केवारी 126.63 एवढी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
