(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Hospital Tragedy: पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर मागणी
पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर छावा आणि स्वराज्य संघटनांची मागणी
Nanded Hospital Tragedy: नांदेडच्या (Nanded District) शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) मागील 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात छावा संघटना आणि स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाले. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. या गोंधळामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नेमकं घडलं काय?
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (5 पुरुष, 7 महिला) आणि 12 नवजात शिशु रुग्ण होते. प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात आणि इतर आजाराने तर बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्याशिवाय, अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.
रुग्णालयाचे डीन म्हणतात...
आमच्या रुग्णालयात अत्याधिक गंभीर अवस्थेत दररोज 12 ते 14 रुग्ण दाखल होतात आणि त्यात काहींचा मृत्यू होतो असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी सांगितले.लहान मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक आणि प्रौढ रुग्णांचा मृत्यू हा व्याधी आणि वय झाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय, मृतांमधील इथे आलेले रुग्ण हे अतिशय गंभीर होते. सर्वतोपरी प्रयत्न करून ही अशा रुग्णांना वाचवता येत नसल्याचेही डॉ. वाकोडे यांनी सांगितले. गंभीर आजारामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, लहान मुले ही अतिशय क्रिटिकल परिस्थितीत इथे दाखल झाले होते असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बचावात म्हटले.
रुग्णालयात कुठल्याही औषधांची कमतरता नसल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले. डॉक्टर आणि कर्मचारी वर्गदेखीलही पुरेसा आहे. आमच्या रुग्णालयात 5 जिल्ह्यातून रुग्ण येतात. सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत आम्ही पूर्ण काळजी घेतो. आमच्याकडे सापाने दंश केल्यावर उपचारासाठी अँटी स्नेक वेनोम औषध उपलब्ध आहेत. महागडी औषध ही आम्ही स्थानिक स्तरावर खरेदी करत असल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटलं आहे.
आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ, रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज : अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर रुग्णालयात असलेले आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी तातडीने रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. 24 मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याने या बातमीने खळबळ उडाली आहे. एवढे मृत्यू 24 तासात कसे झाले याबाबत चव्हाणांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :