नांदेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट, मेहुणे अशोक चव्हाण भाजपात तर दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर
Ashok Chavan & Bhaskarrao Patil Khatgaonkar : अशोक चव्हाण हे भाजपात स्थिर झालेले असताना त्यांचे दाजी भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

Ashok Chavan & Bhaskarrao Patil Khatgaonkar : नांदेडमध्ये मेहुणे-दाजींच्या राजकारणाचा नवा पॅटर्न उदयाला येत आहे. मेहुणे अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपात स्थिर झालेले असताना त्यांचे दाजी भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. भास्करराव पाटील यांनी शंकरनगर इथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेत हा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी खतगावकर यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले आहे.
प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, कोणाच्या तरी हातात आपल्याला सूत्र द्यावेच लागतात. कोणाचे तरी ऐकावेच लागते. त्यामुळे ती सूत्र माझ्याकडे देण्यात आले. माझ्याकडे सूत्र दिले तेव्हा जबाबदारी माझी आहे की, कधीच पक्ष ना बदलणारे आणि माझ्यासारखे चार-पाच पक्ष बदलणारे या सगळ्यांना आपल्याला या पक्षामध्ये सांभाळून घ्यायचे आहे. अजित पवारांसारखे नेतृत्व या महाराष्ट्राला लाभले आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, या आधी नांदेडमध्ये अजित पवारांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांचा प्रवेश झाला आहे. आगामी काळात देखील फार मोठी यादी राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दादांना देखील माझी विनंती राहणार आहे की आजच्या या बैठकीत आपले शिक्कामोर्तब झाले पाहिजे की ते आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी दादांना आणायची जबाबदारी आमची आहे. आमच्या शब्दाला तिथे वजन आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने भर देणारा नेता म्हणून अजित पवारांकडे बघितले जाते. आपण अजित पवारांशी चर्चा करू आणि अजितदादांच्या उपस्थितीत आपण मोठा कार्यक्रम घेऊन प्रवेश करुया, असे प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले. आता भास्करराव पाटील खतगांवकर राष्ट्रवादीत नेमका कधी प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत भास्करराव पाटील खतगांवकर?
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. ते तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार राहिले आहेत. 2014 साली त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भास्करराव खतगावकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान खतगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी आपली स्नुषा डॉ. मीनल पाटील-खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. मात्र, विधानसभेत डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा पराभव झाला. आता भास्करराव पाटील खतगांवकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
आणखी वाचा

























