Nagpur Accident: भरधाव ट्रकची बुलेटला धडक, इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी खाली पडली अन् टिप्परचं चाक अंगावरुन गेलं
Nagpur News: भरधाव ट्रकने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील घटना. कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला घातला.
नागपूर: नागपूरच्या हिंगणा तालुक्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीचा रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रितीका रामचंद्र निनावे (वय 21) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे हिंगणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रितीका निनावे ही हिंगणा येथील वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स या शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती. रितीका सोमवारी महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून तिच्या मित्राच्या दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती. यावेळी सरोदी मोहल्ला येथे मागून भरधाव वेगात आलेल्या एका टिप्परने रितीकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रितीकाचा तोल जाऊन ती खाली पडली. नेमक्या याचवेळी ट्रकचे मागचे चाक रितीकाच्या अंगावरुन गेले आणि ती जागीच गतप्राण झाली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे हिंगणा- बर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींच्या गाडीचा अपघात, धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू