Nagpur Crime : नागपुरात तेरा किलो गांजासह महिलेला अटक; ट्रॅव्हल्समधून बंगळुरुला तस्करी
Nagpur : महिलेला विचारणा केली असता, हा गांजा बंगरुळू येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये जबिनाला या महिलेला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे
Nagpur crime News : ट्रॅव्हल्समधून नागपूरमार्गे बंगरुळू येथे गांजाची तस्करी (ganja smuggling) करणाऱ्या महिलेला धंतोली पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली. महिलेकडून 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (15 जानेवारी) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास केली.
जबिना खान (वय 32, रा. माहूर, नांदेड) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबिना अजनी चौकात ऑरेंज ट्रॅव्हल्समध्ये बसत असताना, तेथील वाहतूक पोलिसांना गांजाचा वास आला. त्यांनी बस थांबवून धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फरताडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अजनी चौकात जाऊन महिलेच्या बॅगची झडती घेतली असता, तिच्याकडे 13 किलो गांजा आढळला. ताब्यात घेऊन विचारणा केली असता, हा गांजा बंगरुळू येथे घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये जबिनाला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.
मुख्य सूत्रधार सावध; कॅरिअर म्हणून महिलेचा वापर...
जबिनाला गांजा बंगरुळू येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ती माहूर येथून नागपुरात आली. गणेशपेठ स्थानक परिसरातून बसल्यास शंका येण्याची शक्यता असल्याने तिने अजनी येथून बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. बंगरुळूमध्ये गांजा नेमका कोणाला द्यायचा, हे तिला तिथे गेल्यावर सांगण्यात येणार होते, अशी माहिती तिने दिले. त्यामुळे केवळ 'कॅरिअर' म्हणून तिचा वापर करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नोव्हेंबरमध्ये पकडला होता 1500 किलो गांजा
गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूरच्या कापसी परिसरात ट्रकवर कारवाई करुन पंधराशे किलो गांजा जप्त केला होता. ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांमध्ये उच्च प्रतीच्या गांजाची जवळपास 50 पोती लपवून ठेवण्यात आली होती. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित 'केनाईन डॉग'च्या मदतीने या ट्रकची तपासणी केली. याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या माहितीवर बीडमध्ये ही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकमध्ये लादलेले सेंद्रिय खत शिर्डीला पाठवण्यात येत होते. त्यामुळे शिर्डीमध्येही यासंदर्भात पोलीस तपास केला होता. दरम्यान संपूर्ण 1500 किलो गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यातही पोलिसांच्या पथकाला महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.
ही बातमी देखील वाचा...