Indian Science Congress: आजची चिमुकलेच उद्याची 'यंग सायंटिफीक ब्रिगेड', इंडियन सायंस काँग्रेसच्या अध्यक्षांचे प्रतिपादन
बाल विज्ञान प्रदर्शनात 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. यात सांडपाण्याचा पुनर्वापर, गॅस गळतीची धोकासुचना देणारा प्रयोग यासारखे प्रयोग आहेत.
Indian Science Congress Nagpur : बालकांमध्ये प्रचंड वैज्ञानिक जिज्ञासा आहे. आताची ही बालके उद्याची 'यंग सायंटिफीक ब्रिगेड' आहे. बालकांमधील जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन इंडियन सायंस काँग्रेसच्या (ISC) अध्यक्षा डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी केले. इंडियन सायंस काँग्रेसच्या निमित्त राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सक्सेना बोलत होत्या.
वैज्ञानिक संशोधन, पर्यावरण, उत्पादन यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस (Indian Science Congress) काम करते आहे. बालकांमध्ये वैज्ञानिक संशोधनवृत्ती वाढीस लागली पाहिजे, त्यासाठी दरवर्षी केवळ बालकांसाठी राष्ट्रीय वैज्ञानिक संमेलन आयोजित केले जाते. तंत्रज्ञानविषयक तत्व समजून घेऊन ते विकसित करण्यासाठी बालकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील नाविन्याचा शोध घेणे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जागृती घडविण्याचे काम भारतीय विज्ञान काँग्रेस करते आहे, असे डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितले.
डॉ. वटे यांनी सांगितले की, या संमेलनातून बालकांना महान वैज्ञानिकांचे कार्य पाहण्याची संधी उपलब्ध होते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम करण्याची जिज्ञासा देखील निर्माण होते. भविष्यात बालकांना देशासाठी विविध क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होणार आहे. बालकांनी आत्मनिर्भर भारताचा भाग होऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या नाविन्यतेची चुणूक दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. मनोरंजन मोहंती म्हणाले की, नाविन्यता कार्यक्रमामध्ये बालकांचा सहभाग महत्वाचा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक प्रयोगशाळांशी जिज्ञासू बालकांना जोडले जावे. बाल वैज्ञानिक संमेलन बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावण्यासाठी उपयुक्त आहे. प्रास्ताविक रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॅा.सुभाष चौधरी यांनी केले. डॅा.रामकृष्णन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनानिमित्त बाल वैज्ञानिकांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 'निरी'चे (NEERI) माजी संचालक डॉ. सतिश वटे, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान कम्युनिकेशनचे प्रमुख डॉ. मनोरंजन मोहंती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, इंडियन सायंस काँग्रेसचे सचिव डॅा.एस.रामकृष्णन, डॉ.अनुपकुमार जैन, डॅा.सुजित बॅनर्जी, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे संयोजक डॅा.निशिकांत राऊत उपस्थित होते.
बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
संमेलनाच्या उद्घाटनानंतर बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन 'निरी'चे माजी संचालक डॉ.सतिश वटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर, गॅस गळतीची धोकासुचना देणारा प्रयोग, दृष्टीदोष सुधारण्यासाठी ॲप, पशुधन स्वच्छता, इमारत बांधकामावर ठिबक सिंचन प्रमाणे पाण्याचा नियंत्रित वापर, लाईफ सेफ्टी हेल्मेट वापर व गाडीचोरीपासून बचाव, गहू तांदळाच्या वेष्टनापासून विविध वस्तु निर्मिती यासारखे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले आहेत.
ही बातमी देखील वाचा...
चांद्रयान- 3 ची तयारी पूर्ण, जून-जुलैमध्ये लॉंचिंग; इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI