कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित कुटुंबांच्या बँक खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार : विजय वडेट्टीवार
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 60 ते 70 हजार पूरबाधित कुटुंबांच्या बँक खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नागपूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुरासंदर्भात पंचनामे अजून पूर्ण झाले नसून तातडीची मदत म्हणून आजपासून पूरबाधित 60 ते 70 हजार कुटुंबांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. एवढेच नाही तर पूरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ, डाळ आणि रॉकेलही मदत म्हणून दिले जाणार आहे. मदत प्रक्रियेतील गैरप्रकार टळावे यासाठी रोख मदत थेट बँक खात्यात केली जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितलं. कोकणासह राज्यात अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज वाटपाची गरज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बँका आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने त्यांनी व्यापाऱ्यांना अल्पदरात कर्ज वाटपाबद्दल निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी याविषयात लक्ष घालावं अशी विनंतीही वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, केंद्राने नुकतंच पाठवलेली 700 कोटींची मदत यंदाच्या नैसर्गिक आपत्ती बद्दल नसून गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी बद्दलची आहे. 3 हजार 721 कोटींची मदत मागितल्यानंतर केंद्राने उशिराच का होईना 700 कोटींची मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो यंदा मात्र पंतप्रधानांसह केंद्रीय पथकाने लवकर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचे दौरे करून मदत करावी, अशी अपेक्षाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेल्या काही प्रमुख गोष्टी :
राज्यात महापुरात 169 अधिकृत मृत्यू असून 1 जण बेपत्ता आहे, तर 55 जण जखमी आहेत. केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांचे नुकसान साधारण आठशे कोटी रुपयांचे आहे, विद्युत विभागाचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, "अजून सर्व ठिकाणी पंचनामे व्हायचे आहेत, सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केले आहे. चिपळूण, महाड, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि मालमत्तेचे नुकसान झालं आहे. या सगळ्यांचे पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय एकूण आकडा आल्याशिवाय आपण मदतीचा निर्णय घ्यायचा नाही, अशी चर्चा झाली आणि तातडीनं दहा हजार रुपये, सोबत काही धान्य बाधित कुटुंबाना लगेच आजपासून मदत करण्याचं ठरलं. किमान साठ-सत्तर हजार तरी कुटुंबाना ही मदत केली जाईल, कुटुंब संख्या वाढू शकते. 10 हजारांची मदत बँकेमार्फत खात्यात करू, भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचे नाही."
"महाड, चिपळूण सारख्या शहरांमध्ये तर सर्व कार्यालय ग्रामपंचायत, नगर परिषद पंचायतीमध्ये पाणी गेलंय सगळे रेकॉर्ड मिळत नाही, त्यामुळे फोटो काढून आणि फोटोलाच ग्राह्य धरून लोकांना मदत करावी लागेल. इन्शुरन्स कंपन्यानासुद्धा आम्ही ते सांगितलं आहे.", असंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "पुढील आठ दिवसांमध्ये सर्व पंचनामे आणि सर्व माहिती शासनाकडे गोळा होईल, तातडीने सगळं करा आणि प्रस्ताव पाठवा म्हणून आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील आपत्ती बद्दल केंद्र सरकारकडे 3 हजार 700 कोटी मागितले होते, मात्र मिळाले फक्त 700 कोटी रुपये. त्यासाठी केंद्राचे धन्यवाद, मात्र आता महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करावा आणि गुजरातच्या धर्तीवर तातडीने मदत करावी."
"कोकणात आणि राज्यात इतरत्र व्यापाऱ्यांना कमी व्याजावर कर्ज द्यावे लागणार. जिल्हा आणि सहकारी बँका सक्षम असतील त्यांनी तो निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांना त्याबद्दल विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या बँकांची स्थिती भक्कम आहे आणि अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना एक-दोन टक्के दराने कर्ज द्यावं. कोकणापेक्षा नांदेड परिसरात शेतीचं जास्त नुकसान झालं आहे.", असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणीही वक्तव्य केली आहेत. ते म्हणाले की, "फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. फोन टॅपिंग कशासाठी केलं जातं हे सर्वांना माहिती आहे. यात जबाबदार असेल्यांवर कारवाई होईल. असे प्रकार राज्यात आणि देशातंही व्हायला नकोत."