Nagpur Tourism: नागपूर जिल्ह्यातील विशेष पर्यटक बससेवा 9 महिन्यापासून बंद; अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन
Tourism Bus : नागपूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी इच्छुकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच गेल्या 9 महिन्यापासून ही सेवा बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Nagpur Tourism News : नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देता यावी, तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली पर्यटन बस सेवा कोरोनाकाळापासून बंद होती. मात्र सर्वकाही सुरू झालं असताना मात्र ही पर्यटन बस सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी इच्छुकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच, गेल्या 9 महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोरोनानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यासोबतच परदेशातून नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना जिल्हयातील पर्यटन ठिकाण बघण्याची इच्छा असते. यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ आगार येथून 'विशेष पर्यटक बससेवा' सुरू केली होती. मात्र, गेल्या 9 महिन्यापासून ही सेवा बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाने 22 मे 2022 रोजी 'विठाई' नावाची एक विशेष पर्यटन बससेवा सुरू केली होती. गणेशपेठ येथून ही बस धावत होती. प्रत्येक रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ही बस सेवा असायची. मात्र आता पर्यटकांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत असल्याने अनेकांनी पर्यटनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
दिवसभरात जिल्ह्यातील पर्यटन दर्शन
सकाळी 8 वाजता बस निघायची. सर्व पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर ही बस रात्री 8 वाजता परतायची. या प्रवासाचे भाडे 295 रूपये होते. ज्येष्ठ नागरिकांना आणि 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 50 टक्के सवलत होती. या बसमधील पर्यटक प्रवाशांनी या सेवेबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. लांबच्या पल्ल्यासाठी कमी दरांत ही सेवा उपलब्ध होती. जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणाला ही बस भेट देत होती. अनेक प्रवासी अॅडव्हॉंन्स बुकिंगही करत होते. त्यानंतरही ही सेवा थंडबस्त्यात गेली. गणेशपेठ आगारात बससेवेचा फलक पाहून अनेकांकडून विचारपूस करणाऱ्यांची संख्याही घटली नाही. विचारपूस केल्यावर सेवा बंद असल्याचे कळताच पर्यटक नाराज होतात. ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या जागांना भेटी
या सेवेअंतर्गत शिवमंदिर, सूराबडीं, विदर्भचे पंढरपूर, श्री क्षेत्र धापेवाडा, गणेश मंदिर, श्री क्षेत्र आदासा, लेक अॅंड गार्डन, खिंडसी, श्रीराम गढ मंदिर, ड्रॅगन पॅलेस कामठी आदी ठिकाणी भेट देत होती. सध्या ही सेवा बंद असली तरी, येणाऱ्या काळात ती पुन्हा सुरू होईल, अशी ग्वाही एका जबाबदार अधिकाऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :