'आधारकार्ड' बनवून देण्यासाठी सरपंचाची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सरपंच शैलेश राऊत विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपी शैलेश राऊत सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
नागपूर : आधारकार्ड बनवून देण्याच्या बदल्यात सरपंचाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील रामटेक तालुक्यात काचुरवाही गावातील ही खळबळजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसंनी सरपंच शैलेश राऊत विरोधात विनयभंगाच गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला गावातील एका पुरुषासोबत दुसरा विवाह करुन राहायला आली होती. तिच्याकडे नव्या नावाचे आणि पत्त्याचे आधारकार्ड नव्हते. तसेच पतीच्या रेशनकार्डवर देखील तिचे नाव नव्हते. यासाठी पीडित महिला गेले अनेक दिवस ग्रामपंचायत आणि सरपंचाकडे फेऱ्या मारत होती.
मात्र सरपंच शैलेश राऊत तिचे काम करुन देण्यास टाळाटाळ करत होता. सर्व कामे करुन देण्याच्या बदल्यात सरपंच शैलेश राऊत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. पीडित महिलेने सरपंचाचं फोनवरील संभाषण रेकॉर्ड केलं होतं. संबंधित ऑडिओ क्लिप आपल्या कुटुंबियांना देत महिलेने हा सगळा प्रकार उघडकीस आणला.
दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबियांनी सरपंच शैलेश राऊतला सगळ्या प्रकाराचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने उलट पीडित महिलेच्या कुटुंबियांनाच अरेरावी केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सरपंच शैलेश राऊत विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असला तरी तो फरार झाला आहे.