(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swachh Nagpur : शहराच्या स्वच्छतेसाठी मनपाचे 'स्पेशल 900'; नेमली 'स्मार्ट स्वच्छता टीम'
Nagpur News: 3 महिन्यांपूर्वी मनपातर्फे 104 कर्मचाऱ्यांच्या चमूची नियुक्ती करण्यात आली होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर ही विशेष चमू तयार करण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे
Nagpur News: शहरातील नियोजनबद्ध स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे (NMC) 38 प्रभागांतील 900 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विशेष 'स्मार्ट स्वच्छता टीम'ची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रभागातील विशेष टास्क सोपविण्यात येणार असून सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत ही टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती मनपाच्यावतीने देण्यात आली.
नियमित स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेची जबाबदारी असते. मात्र वाहनांमुळे धूळ रस्त्याच्या बाजूला आणि दुभाजकांवर साचत असते. तसेच पावसाळ्यामुळे त्यावर गवत उगवते. त्याच्या स्वच्छतेसाठी तसेच विशेष स्वच्छता अभियान राबविण्यासाठी या विशेष 'टास्क फोर्स'ची नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) स्वच्छता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या पटांगणात स्वच्छता प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, अनित कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड, लोकेश बासनवर यांचासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
'स्पेशल 104'चा प्रयोग यशस्वी
तीन महिन्यांपूर्वी मनपातर्फे 'स्पेशल 104' कर्मचाऱ्यांच्या चमूची नियुक्ती करण्यात आली होते. या चमूवर शहरातील मुख्य मार्गांवरील रस्त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर ही विशेष चमू तयार करण्याची योजना अमलात आणण्यात आली, असल्याचे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
'स्मार्ट स्वच्छता टीम'मध्ये...
प्रभागासाठी कार्यरत प्रत्येक टीम मध्ये सहा सदस्य राहतील आणि प्रत्येकी चार टीमच्या मागे एक निरीक्षक असे कर्मचारी असणार आहेत. ही स्वच्छता चमू नागपूर शहराला स्वच्छ करण्यासाठी आणि सुंदर स्वरूप प्रदान करण्यासाठी इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच कार्य करणार आहे. शहरातील मनपाचे धंतोली आणि सतरंजीपुरा झोन वगळता इतर सर्व प्रभागात 24 कर्मचारी असणार आहे. तर तीन वार्ड असणाऱ्या धंतोली आणि सतरंजीपुरा झोनमध्ये प्रत्येकी 18 कर्मचारी असणार आहेत.
नागरिकांमध्येही जनजागृती
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 50 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. याच उप्रकामांचा एक भाग म्हणून ही प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. यात सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे, शहरातील पादचारी मार्ग स्वच्छ करताना कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे आदी बाबींवर प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन केले जात असल्याचे यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. नागरिकांना ओला कचरा हिरव्या बॅकेट मध्ये आणि सुका कचरा निळ्या बॅकेट मध्ये गोळा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
इतर महत्त्वाची बातमी