(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : नितीन गडकरी धमकी प्रकरण, नागपूर पोलीस आरोपी जयेश कांथाविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता
जयेश कांथा विरोधात नागपूर पोलीस धमकीच्या पहिल्या कॉलच्या प्रकरणात (14 जानेवारीला केलेला धमकीचा कॉल) ही युएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे (Nitin Gadkari Threat Call) फोन करणाऱ्या जयेश कांथा उर्फ शाकीर विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदवला जाण्याची दाट शक्यता आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनंतर नागपूर पोलीस जयेश कांथा विरोधात यूपीए अन्वये दुसरा गुन्हा नोंदवण्याच्या विचारात आहे.
जयेश कांथा उर्फ शाकीरने बेळगावच्या तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्च असे दोन वेळेला धमकीचे कॉल केले होते. धमकीचे दुसऱ्या कॉलनंतर नागपूर पोलिसांनी बेळगावात जाऊन बेळगावच्या तुरुंगातून जयेश कांथाला ताब्यात घेत नागपुरात आणले होते. नागपुरात त्याच्या विरोधात 21 मार्चला दिलेल्या धमकीच्या प्रकरणात युएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच जयेश कांथा नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारावर आता नागपूर पोलीस धमकीच्या पहिल्या कॉलच्या प्रकरणात (14 जानेवारीला केलेला धमकीचा कॉल) ही युएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी ही बेळगावमध्ये जयेश कांथा उर्फ शाकीर विरोधात काही गुन्ह्यांची नोंद केली. गुन्ह्याची नोंद केल्यानंतर कर्नाटक पोलीस हे नागपूर पोलिसांकडून जयेश चा ताबा मागत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जयेश कांथा विरोधात नागपुरात युएपीए अन्वये दुसरा गुन्हा नोंदवला जातो की त्याआधी कर्नाटक पोलीस जयेश चा ताबा देतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून शाकीरनं धमकी दिल्याचं तपासात उघड
बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळेला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्या सर्व अनुषंगाने नागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करत असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा: