(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Post : नागपुरात लवकरच होणार ड्रोनद्वारे पोस्टाची डाक पार्सल सेवा
केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार गुजरातमधील भूज तालुक्यात हा प्रयोग करण्यात आला आहे. असाच एक पायलट प्रोजेक्ट नागपूर विभागात हाती घेतला जाणार आहे.
Nagpur Post Office News : भारतीय टपाल विभागाच्या (India Post) वतीने येत्या काही महिन्यातच प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच नागपूर विभागात ड्रोनच्या (Drone) मदतीने पार्सल सेवा दिली जाणार आहे. यामुळे कमी वेळात पार्सल आणि अत्यंत आवश्यक असलेली डाक पत्रे नागरिकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर (Postmaster) जनरल शोभा मधाळे यांनी दिली. भारतीय टपाल विभागाने यापूर्वी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने ही सेवा सुरू केली आहे. ड्रोनमुळे केवळ 25 मिनिटांत 46 किमीचे अंतर कापले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या मार्गदर्शनात भूज तालुक्यात हा प्रयोग करण्यात आला आहे. असाच एक पायलट प्रोजेक्ट नागपूर विभागात हाती घेतला जाणार आहे. भविष्यात ड्रोनद्वारे पार्सल, मेल आदी वितरित करणे शक्य होणार आहे.
नियोजनाचे काम सुरु
मुख्यत: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) एक पाऊल पुढे जात आहे. देशात प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने मेल पाठविण्याची सुविधा कच्छ येथे प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. सिव्हिल लाइन्स येथील मुख्य डाक घरातून ड्रोनव्दारे पार्सल देण्यासाठी नियोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे गंतव्यस्थानापर्यंत पार्सल वितरीत करण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल, असाच प्रयत्न राहणार आहे.
वैद्यकीय डाक पार्सल
विशेषत: डाक पार्सलमध्ये वैद्यकीय संबंधित साहित्य पाठविण्यास प्राधान्य राहणार आहे. या नव्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पार्सल पाठविणे, मेल पाठविण्याच्या खर्च ग्राहकांकडून वसूल केल्या जाणार आहे. सिव्हिल लाइन्समधून ड्रोनद्वारे पार्सल सेवा देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सुरु केलं जात आहे. यासाठी एक वेगळी टीम तयार केल्या जाणार आहे. नागपुरात हा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या (commercially Sucessful) यशस्वी झाल्यानंतर इतर ठिकाणी टपाल पार्सल सेवा अधिक वेगाने देण्याचा प्रयत्न होणार आहे.
खासगी 'प्लेअर्स'सोबत पोस्टाची स्पर्धा
यापूर्वी अॅमेझॉन, डॉमिनोज, फ्लिपकार्ट आदींनी आपल्या पार्सलच्या डिलिवरीसाठी ड्रोनचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे. अनेक देशांमध्ये खासगी कंपन्यांचा हा प्रयोग यशस्वीही झाला. मात्र भारतीय डाक विभाग खासगी कंपन्यांच्या तुलनेत कशा प्रकारे ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय डाक विभागाच्या पिन कोडद्वारेच खासगी कुरिअर कंपन्या डाक पोहोचवतात. मात्र नेटवर्क असूनही खासगी कुरिअर कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या