Online Fraud : फसवणुकीसाठी मजूर, नोकर, चप्पल बनवणाऱ्याच्या नावे 55 बँक खाती, ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणातील सोंटू जैन पुन्हा फरार
Nagpur Online Fraud : नागपूर ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी सोंटू जैन पुन्हा एकदा फरार झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर: सोंटू जैनच्या ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात (Nagpur Online Fraud) एक दोन नव्हे तब्बल 55 बँक खात्यांचा वापर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये त्याचे नोकर, घरकामगार, मजूर, चप्पल बनवणारे अशा अनेक गरिबांच्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. सोंटू जैनने कोट्यवधींची रक्कम या 55 खात्यातून फिरवून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे उघड झालं आहे. मंगळवारी न्यायालयातून अटकपूर्व अंतरिम जामीन रद्द होताच सोंटू जैन नागपुरातून पुन्हा फरार झाला आहे.
चप्पल बनवणाऱ्याच्या नावानेही खाते
तब्बल 58 कोटींची फसवणूक करून आधी दुबईला पळून गेलेला आणि नंतर चौकशीसाठी नागपुरात आलेला अनंत उर्फ सोंटू जैन पुन्हा एकदा फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोंटू जैनने पोलीस आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी एक, दोन नव्हे तर तब्बल 55 बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. नोकर, कामगार, मजूर, चप्पल बनवणारा असे अनेक गरिबांचे बँक खाते सोंटू जैनने वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या 55 खात्यातून सोंटू जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जमवलेली कोट्यवधींची रक्कम अखेरीस आपल्या बँक खात्यात आणल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सोंटू जैनचे हे प्रकरण दिसते तेवढे सरळ नसून यात आणखी काही मोठे गुन्हेगार सहभागी असल्याची शंका पोलिसांना आहे.
अनंत उर्फ सोंटू जैनने विक्रांत अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंग मध्ये 58 कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. 21 जुलै रोजी विक्रांत अग्रवाल याने नागपूर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर 22 जुलै रोजी नागपूर पोलिसांनी सोंटूच्या गोंदिया येथील घरावर धाड टाकली होती. तेव्हा सोंटूच्या घरातून तब्बल 12 किलो सोनं, 294 किलो चांदी आणि सुमारे 17 कोटींची रोख रक्कम मिळाली होती. नंतर गोंदिया मधील सोंटू जैनच्या काही बँक लॉकरमधूनही 4.54 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती.
जामीन रद्द झाल्यांतर पुन्हा फरार
धाड पडण्याच्या तीन दिवस आधी म्हणजेच 19 जुलै रोजी सोंटू जैन दुबईला पळून गेला होता. दीड महिन्यानंतर तो नागपुरात आला होता. मात्र तोवर त्याने वकिलांच्या मदतीने अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. मंगळवारी संध्याकाळी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व अंतरिम जामीन रद्द केला. त्यानंतर सोंटू जैनला अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी त्याच्या शोध सुरू केला. मात्र त्याच्या आधीच तो नागपुरातून पळून गेल्याची माहिती आहे. सध्या नागपूर पोलिसांचे अनेक पथक वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहे.
ही बातमी वाचा: