नागपूरमधील नदी प्रदूषण रोखण्यासाठी "चला जाणूया नदी' उपक्रम, जनजागृतीसाठी गावागावंमध्ये आमसभा
Nagpur News Update : नागपूरमधील नदी प्रदूषण रोखण्यासाठी "चला जाणूया नदी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नदी परिसरातील लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
Nagpur News Update : नदी प्रदूषणाबाबत ( Rivers Pollution ) नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी नागपूरमधील नाग आणि आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील (Catchment areas of rivers) गावांमध्ये आमसभा घेण्यात येणार आहे. 'चला जाणूया नदी' या अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याच्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचा सूचना दिल्या.
'चला जाणूया नदीला' या अभियानांतर्गत आयोजित बैठकीत अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य डॉ. प्रवीण महाजन, नदी बचाव क्षेत्रात काम करणारे प्रद्युम्न सहस्त्र भोजने, डॉ. विजय घुगे, मुन्ना महाजन, अरविंद कडवे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजया बनकर यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या अभियाना अंतर्गत नद्या प्रदुषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी नाग नदी (Nag river) आणि आम नदी निवड केली आहे.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आज या संदर्भात सर्व जिल्हास्तरीय सदस्यांना कामाची आखणी आणि अहवाल तयार करण्याचे सांगितले आहे. नद्यांची शुद्धता ही नदी परिसरातील सर्व गावांमधील जनजागृतीवर अवलंबून असल्यामुळे सर्वप्रथम या संदर्भात येत्या शनिवारी या गावांमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाचे दर 15 दिवसांनी बैठका घेऊन निर्धारित वेळापत्रकानुसार कार्य करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नद्यांच्या स्वच्छतेबाबत उदासिनता
शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी सार्वजनिक खासगी भागीदारी (Public private partnership) तत्वावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च करुनही नद्यांची स्थिती अतिशय दैनिय आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकवेळा प्रशासनाला खडसावले आहे. तरी देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नद्यांच्या सध्याच्या स्थितीवरुन दिसून येत आहे. शहरातील गोकुळपेठ, गिरीपेठ, ग्रेटनाग रोड मार्गावरील नदी स्वच्छता कार्यात अनेकवेळा नदीतून काढलेला गाळ नदीच्या शेजारीच फेकण्यात येतो. त्यानंतर पहिल्या पावसात पुन्हा तोच गाळ आणि कचरा नदीत वाहून जातो. याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे.
ही बातमी देखील वाचा