Nagpur News: न्यायाधीशांची कार काढून शहरात फेरफटका मारणे पोलीस शिपायाला पडले महागात, पोलीस दलातून कायमची हकालपट्टी
Nagpur News: न्यायाधीशांच्या निवासाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून तो नागपूर शहरात आलिशान कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला.
नागपूर : उच्च न्यायालयाच्या (High Court) न्यायाधीशाच्या बंगल्यातून न्यायाधीशाची कार काढून शहरात फेरफटका मारणे एका पोलीस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबितच केले नाही तर त्याची पोलीस दलातून थेट हकालपट्टी केली आहे. नागपूरमध्ये (Nagpur News) ही घटना घडली आहे.
नागपूर पोलिसांचा अमित झिल्पे नावाचा पोलीस कर्मचारी 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून तैनात होता. मध्यरात्रीनंतर न्यायाधीशांना काहीही माहित होणार नाही असा विचार करून अमित झिल्पेने न्यायाधीशांची खाजगी कार बंगल्याबाहेर काढली आणि न्यायाधीशांच्या निवासाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून तो नागपूर शहरात आलिशान कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला. मात्र दुर्दैवाने वायूसेना नगर भागात एका विजेच्या खांबावर ती आलिशान कार ठोकली गेली. त्यामध्ये कारचे प्रचंड नुकसान झाले. घाबरलेल्या अमित झिल्पेने रात्रीच्या अंधारातच ती कार पुन्हा न्यायाधीशांच्या बंगल्यावर आणली आणि होती त्या ठिकाणीच उभी केली.
कर्मचाऱ्याने स्वत: दिली कबुली
सकाळी न्यायाधीश जागे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कारची दुर्दशा पाहिली. रात्री बंगल्याच्या पोर्चमध्ये सुरक्षितरीत्या उभी केलेली कार सकाळी अशी अपघातग्रस्त कशी काय झाली असा प्रश्न त्यांना पडला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. न्यायाधीशाच्या बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.. आणि त्यामध्ये न्यायाधीशांची कार मध्यरात्री रस्त्यांवर धावताना दिसली. बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी अमित झिल्पे ला विचारणा करण्यात आली आणि त्याने आपणच फेरफटका मारण्यासाठी कार बंगल्याबाहेर नेल्याची कबुली दिली.
पोलीस दलातून कायमची हकालपट्टी
सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमित झिल्पेला निलंबित केले होते. मात्र, त्याची कृती पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणारी असल्याने त्याची पोलीस दलातून कायमची हकालपट्टी (dismiss) करण्यात आली.
हे ही वाचा :