Nagpur News : नागपूर जेलमध्ये कैद्यावरील अत्याचार प्रकरणाला नवीन वळण, लैंगिक संबंधांचा पुरावा आढळला नाही
Nagpur News : नागपूर कारागृहात अंडरट्रायल कैद्यावरील अत्याचार प्रकरणाला नवीन वळण आले आहे. आरोपी कैद्याने पीडित कैद्यावर अत्याचार केल्याचे कोणतेही सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
नागपूर : नागपूर कारागृहात (Nagpur Central Jail) अंडरट्रायल कैद्यावरील (Prisoner) अत्याचार प्रकरणाला नवीन वळण आले आहे. आरोपी कैद्याने पीडित कैद्यावर अत्याचार केल्याचे कोणतेही सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. वैद्यकीय तपासानंतर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (GMCH) अधिकाऱ्यांनी 29 वर्षीय अंडरट्रायल पीडित कैद्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे कारण देत पीडित कैद्याला संस्थात्मक उपचारांसाठी प्रादेशिक मनोविकार रुग्णालयात पाठवले.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जामिनाच्या सुनावणीदरम्यान एका सहकारी दोषीने लैंगिक अत्याचाराची तक्रार विशेष न्यायाधीशांकडे केली होती. न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली, अंडरट्रायलचे जबाब नोंदवले, त्याच्या कुटुंबीयांना बोलावले आणि धंतोली पोलिसांना त्याची लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात तुरुंगाच्या रुग्णालयात सहकारी दोषीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे तो जखमी झाला आणि रक्तस्त्राव झाला असे पुढे आले. या आरोपानंतर, बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आधीच तुरुंगवास भोगत असलेल्या गुन्हेगारावर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, नंतर अंडरट्रायलने माघार घेतली, पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला आणि तपास पथकाला पुराव्यासाठी त्याचे कपडे गोळा करण्यास परवानगी दिली नाही. GMCH मध्ये वैद्यकीय तपासणी दरम्यान, लैंगिक संबंधाचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले.
याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असला तरी गुन्हा करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता पोलीस नाकारु शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहे.
काय आहे प्रकरण?
बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने दुसऱ्या बराकीतील एका युवा कैद्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार थेट न्यायाधीशांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी कैद्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीने मुंबईतील अंधेरी भागातील एका महिलेवर बलात्कार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली होती आणि त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवलं होतं. त्याची केवळ दोन वर्षे शिक्षा बाकी होती. त्याला कैद्यांचा वॉर्डन म्हणून कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्या रुग्णालयात तक्रारदार कैदी सुद्धा दाखल होता. हा कैदी हत्याकांडाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 1 ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तक्रारदारकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, त्याने नकार दिल्यामुळे आरोपीने त्याच्या गळ्यावर धारदार वस्तू लावून बळजबरी लैंगिक अत्याचार केला. बुधवारी (2 ऑगस्ट) तक्रारदार कैद्याची न्यायालयात पेशी होती. त्यावेळी त्याने न्यायाधीशांना लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार केली. त्यानंतर चौकशीअंती तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा
Nagpur Crime : नागपुरात 24 तासात दोन हत्या, दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीला संपवलं