Nagpur News : एसटी भरतीत चालक-वाहकांकडून अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन
Nagpur News : एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेत चालक-वाहक यांच्याकडून अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाखाली तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Nagpur News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या (MSRTC Recruitment) भरती प्रक्रियेत चालक-वाहक यांच्याकडून अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाखाली तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपुरातील (Nagpur) धापेवाडा एसटी बसस्थानकावरचा पैसे गोळा करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे तिन्ही अधिकारी अंतिम चाचणीसाठी परीक्षक मंडळात होते. त्यानंतर या प्रकरणी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाने कारवाई करत संबंधित तीन अधिकाऱ्यांच्या निलंबित केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैशांची मागणी, व्हिडीओ व्हायरल
नागपुरात एसटीच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या चालक आणि वाहकांकडून त्यांच्या अंतिम पात्रता चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी हे तीन अधिकारी पैसे गोळा करत होते. अंतिम चाचणीत बस रिव्हर्स घेण्यात अपयशी ठरलेल्या( अपात्र झालेल्या) उमेदवारांना भरतीत सामावून घेण्यासाठी प्रत्येकी 2100 रुपये द्यायचे आहे असे सांगून पैसे गोळा करत असल्याचा काही परीक्षार्थी उमेदवारांचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची एसटी महामंडळाच्या दक्षता अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात प्राथमिक चौकशीच्या अहवालातनंतर निलंबनाचे आदेश निघाले आहे. निलंबित झालेल्यांमध्ये विभागीय वाहतूक अधिकारी, यंत्र अभियंता आणि साह्यक वाहतूक निरीक्षक या तिघांचा समावेश आहे.
सरळ सेवा भरती पद्धतीने नागपूरसह राज्यात 4 हजार चालक-वाहकांची भरती
एसटी महामंडळात सरळ सेवा भरती पद्धतीने 2019 मध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 183, तर राज्यभरासाठी जवळपास चार हजार चालक आणि वाहकांची भरती पार पडली होती. मात्र नंतर कोरोना आणि एसटीच्या संपामुळे या वाहक आणि चालकांना अंतिम नियुक्ती मिळू शकली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने या चालक आणि वाहकांना अंतिम नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या चालक आणि वाहकांच्या अंतिम चाचणी घेण्यात आली. या अंतिम चाचणीमध्ये चालक आणि वाहकांचा प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं कौशल्य तपासलं जातं. त्यासाठी 18 वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या चाचण्या घेतल्या जातात. मात्र नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे या चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 2100 ते 3000 रुपये घेण्यात आल्याचे या व्हिडीओमधून दिसून आलं.
संबंधित बातमी