Nagpur Gram Panchayat Election : सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भाजपकडून सादर, नागपुरातील 70 टक्के ग्रामपंचायतीमध्ये बहुमत असल्याचा दावा
Nagpur Gram Panchayat Election : नागपुरातून निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भाजपकडून सादर करण्यात आली आहेत. दरम्यान 70 टक्के उमेदवार निवडून आल्याचा दावा केला जातोय.
नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात मोठ्या संख्येने भाजप (BJP) आणि भाजपच्या मित्र पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. जवळपास 70 टक्के ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchyat) भाजपला बहुमत मिळत असल्याचा दावा केला जातोय. याच दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपने सरपंच पदी निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
नागपूर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सरपंच पदी निवडून आलेल्या 140 उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र एबीपी माझा समोर सादर केले. संध्याकाळपर्यंत नागपुरातील 357 ग्रामपंचायती पैकी 70 टक्के ग्रामपंचायत मित्र पक्षांसह जिंकण्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता भाजपचा हा दावा सत्यात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्रतिज्ञापत्र का सादर केलीत?
मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि शरद पवार गट जनतेशी खोटं बोलत आहेत. निवडणूक झाल्यानंतर कोणताही उमेदवार त्यांचा असो किंवा नसो तो माझाच असल्याचा आरडाओरडा त्यांना करायची सवय आहे. हाच खोटारडेपणा आम्हाला लोकांसमोर आणायचा होता. त्यासाठी ज्या दिवशी आम्ही पॅनल सेट केलेत त्याच दिवशी आम्ही प्रतिज्ञापत्र उमेदवारांकडून लिहून घेतलीत. आम्ही जर ही प्रतिज्ञापत्र सादर केली नसती तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसकडून निवडून आलेला उमेदवार हा आमचा असल्याचं दावा केला असता, नागपूर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधथाना म्हटलं.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काका अनिल देशमुख यांचा भाजपने दारुण पराभव केल्याचा दावा केला आहे. अनिल देशमुख यांनी किमान या वयात खोटे बोलू नये, काटोल मतदारसंघातील 82 ग्रामपंचायतींपैकी अनिल देशमुख यांना फक्त दहा ते बारा ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केलाय.
राज्यात ग्रापंचतींची रणधुमाळी
राज्यात एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास 600 पेक्षा अधिक जागांवर भाजपचा झेंडा फडकला असल्याचं चित्र आहे. तसेच 350 पेक्षा जास्त जागा जिंकून अजित पवार गट हा दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं आहे.
हेही वाचा :
Nashik News : नाशिकच्या कसमादे पट्ट्यात अजित पवार गटाची सरशी, भाजपला पाच जागा, असे आहे पक्षीय बलाबल