(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकच्या कसमादे पट्ट्यात अजित पवार गटाची सरशी, भाजपला पाच जागा, असे आहे पक्षीय बलाबल
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात पाच तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांत अजित पवार गटाने सरशी केली आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election) निकाल हळूहळू हाती येत आहेत. जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात पाच तालुक्यांतील 19 जागांचा निकाल जाहीर झाला असून, यात अजित पवार गटाने सरशी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आठ जागा जिंकल्या असून पाच जागांवर भाजपचे (BJP) कमळ फुलले आहे. तर ठाकरे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. तर चार जागा अपक्षांकडे गेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 48 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा सुरु असून, यातील 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 45 ग्रामपंचायतीसाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 82 टक्के इतके मतदान झाले. यानंतर आज सकाळपासुन मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत तीसहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. तर आताच नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात असलेल्या मालेगाव (Malegaon), कळवण, देवळा, बागलाण (Baglan), येवला (Yeola) तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. यात अजित पवार गटाने आठ जागा जिंकत विजय मिळवला आहे. तर भाजपाला पाच जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत. या निकालाने जिल्ह्यातील अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून आले आहे.
दरम्यान 19 जागांचा निकाल पाहता मालेगाव (Malegaon) तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे. सिमा अनिल निकम यांची सरपंचपदी निवड झाली आहे. कळवण तालुक्यात पाच जागांवर अजित पवार गटाची सत्ता आली असून सरलेदिगर - सुमतीलाल बागुल, कोसवन - संदीप भोये, कड़की - उत्तम भोये, देसगाव - जिजाबाई बागुल, करंभेळ - भगवान गावित अशा उमेदवारांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. या ग्रामपंचायतीवर बापूसाहेब जाधव यांची सरपंच पदावर वर्णी लागली आहे. माळवाडी, फुलेमाळवाडी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली असून, अनुक्रमे लंकेश बागुल, अल्काबाई पवार हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. बागलाण तालुक्यातील अनुक्रमे चिराई, भवाडे या ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे. यात अनुक्रमे शंकूतला पाटील, पंडित अहिरे यांची सरपंच पदावर नियुक्ती झाली आहे. केळझर - अनिल बागुल, शिवसेना (ठाकरे गट), भाक्षी - चेतन वणीस (अपक्ष), मुळाणे - संदीप कृष्णा निकम (शेतकरी पक्ष), केरसाणे - फुलाबाई साहेबराव माळीस (अपक्ष), जामोटी - वंदना पोपट ठाकरे (भाजप), तताणी - गजानन पंडित ठाकरे (अपक्ष), तर येवला तालुक्यात लौकी शिरस - प्रदीप रमेश कानडे (राष्ट्रवादी,अजित पवार), शिरसगाव लौकी - ज्ञानेश्वर रामदास शेवाळे (राष्ट्रवादी, अजित पवार) असा एकूण निकाल लागला आहे.
असे आहे पक्षीय बलाबल
अजित पवार गटाला आठ जागा, भाजपाला 5 जागा, ठाकरे गट 2 जागा, अपक्ष चार जागा अशा एकूण 19 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात बागलाण तालुक्यातील आठ जागांचा निकाल लागला आहे. यात भाजप - 03, अपक्ष - 04, ठाकरे गट - 01, कळवण तालुक्यातील पाचही जागांवर अजित पवार गट, देवळा एकूण जागा - 03, ठाकरे - 01, भाजप - 02 असा निकाल लागला आहे. मालेगाव एकूण जागा - 01 राष्ट्रवादी (अजित पवार) - 01, येवला - एकूण जागा -02 - राष्ट्रवादी (अजित पवार) - 02 असा निकाल जाहीर झाला आहे.
इतर महत्वाची बातमी :