Nagpur Flood : नागपुरात हजारो कार बिघडल्या! 'पावसाच्या पाण्यात बुडालेली कार स्टार्ट करु नका, टो करुन आणा'
Nagpur Flood : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात बुडालेल्या कारची रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नागपूर (Nagpur) : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात (Nagpur Flood) बुडालेल्या कारची (Car) रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तज्ञांच्या मते पाण्यात बुडालेली कार सुकली म्हणून ती सुरु करण्याचा प्रयत्न न करता वर्कशॉपमध्ये टो करुन आणली तर ती पूर्णपणे दुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते. मात्र कारमालकांनी कार स्वतःहून चालू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये पाण्यामुळे आणखी नुकसान होऊ शकतं असा तज्ञांचं म्हणणं आहे.
विमा कंपन्यांकडून कारची ए, बी, सी अशी वर्गवारी
कारचा विमा असल्यास पाण्यात बुडालेली कार पूर्णपणे दुरुस्त होऊन विमा कंपनीकडून त्याचा परतावा मिळू शकतो. पाण्यात बुडालेल्या कार संदर्भात विमा कंपन्या ए, बी, सी अशा तीन वर्गवारी करतात. ए वर्गवारीमध्ये कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार, बी वर्गवारीमध्ये सीट पर्यंत पाण्यात बुडालेली कार आणि सी वर्गवारीमध्ये डॅशबोर्ड आणि त्याच्या वरपर्यंत पाण्यात बुडालेली कार अशी वर्गवारी असते. कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार दोन ते तीन दिवसात दुरुस्त होऊन मिळू शकते. मात्र बी आणि सी वर्गवारीची कार दुरुस्त होऊन मिळण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो असंही तज्ञांचं म्हणणं आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकल्सना जास्तीत जास्त परतावा
इलेक्ट्रिक व्हेईकलचं पाण्यामध्ये जास्त नुकसान होऊ शकतं. मात्र त्याचाही इन्शुरन्स कंपनीकडून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. त्याच्या कुठल्या पार्ट्सचं नुकसान झालं आहे त्यावर नुकसान भरपाई अवलंबून असते.
नागपुरात चार तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस
उपराजधानीत शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे अनभिज्ञ असलेले नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. काही परिसरात तब्बल सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं. शहरातील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपूरकरांवर आस्मानी संकट कोसळलं होतं.
नागपुरातील पुरात पाच जणांचा मृत्यू
दरम्यान, नागपूरमधील पुरामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विविध घटनांमध्ये पाच जण दगावले आहे. यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. एक पुरुष वगळता इतर चौघांची ओळख पटलेली आहे.
हेही वाचा
Devendra Fadanvis: फडणवीसांनी पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की? भाजपकडून 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण