Nagpur Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; पतीला अटक
Nagpur Crime News: चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे.
Nagpur News नागपूर : चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या (Crime)केल्याची धक्कादायक घटना नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातून समोर आली आहे. ही घटना नागपूर जिल्हातील भिवापूर तालुक्यात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police) संशयित आरोपी पतीला अटक केली आहे. दुर्गा प्रमोद वावरे (32) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर प्रमोद कुसन वावरे (40) असे या प्रकरणातील संशयित आरोपी पतीचे नाव आहे.
रागाच्या भरात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
प्राप्त माहिती नुसार, दुर्गाचा पाती कायम तिच्यावर चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून या दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता. तर कधी या वादाचे रूपांतर हाणामारी मध्ये देखील होत होते. परिणामी वारंवार होणाऱ्या या मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून दुर्गाने घर सोडून आपल्या वडिलांकडे कायमचे राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रमोदने दुर्गाची समजूत काढत तिला घरी आणले होते. दरम्यान, 4 मार्च रोजी त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन स्वत: प्रमोदने दुर्गाला तिच्या वडिलांकडे भंडारा येथे नेऊन सोडले होते. तेव्हा पासून ती आपल्या वडिलांकडे राहत होती. त्यानंतर मंगळवर 13 मार्चला दुर्गा आपल्या सासरी भिवापूरला परत आली. मात्र पती प्रमोद आणि तिच्या सासू सासऱ्यानी दुर्गासोबत वाद घालत तिला घरी परत घेण्यास नकार देत तिला मारहाण केली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय
त्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 मार्चच्या सकाळी दुर्गाचा मृतदेह त्यांच्याच घरात असलेल्या पलंगावर आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कालांतराने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी दिली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली. पोलिसांना पंचनामा करत असतांना दुर्गाच्या गळ्यावर आणि मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यावरून दुर्गाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. परिणामी या संशयावरून पोलिसांनी तिचा पती प्रमोद कुसन वावरे याला ताब्यात घेऊन त्यांची कसून विचारपुस केली असता त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तर पंचनामा केल्यानंतर पुढील कारवाईसाठी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या