Nagpur News : बायकोच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पतीसह सासूचा मृत्यू, नागपूरातील धक्कादायक घटना
Road Accident : वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव कारचालकाने रस्ता ओलांडणाऱ्यांना जोरदार धडक दिली. अन् कारचालक लगेच फरार झाला. जोरदार आवाज झाल्याने सर्वांनी मागे वळून पाहिले असता भयानक दृश्य दिसले.
Nagpur News : आईच्या वाढदिवसाच्या साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेच्या पती आणि सासूचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. गणेश माधवराव पुंजरवार (वय 53) व देवकाबाई माधवराव पुंजरवार (वय 70, सुयोगनगर) अशी मृतांची नावे आहेत.
गणेश पुंजरवार यांच्या पत्नीच्या आईचा वाढदिवस होता. त्यामुळे त्या पती, सासू, भाऊ, वहिनी व इतर कुटुंबीयांसह वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी गेल्या. संबंधित हॉटेल बंद झाल्याने त्यांनी कार तेथेच पार्क केली व पलीकडे असलेल्या हॉटेल तृप्ती येथे जेवण केले. जेवण करून घरी जाण्यासाठी सर्व निघाले, कारपर्यंत जाण्यासाठी सर्वजण वर्धा मार्ग ओलांडत होते. वाढदिवस असलेल्या सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय 71, ओमनगर) यांच्यासह गणेश व देवकाबाई होत्या. वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यात तिघेही जण गंभीर जखमी झाले. कारचालक लगेच फरार झाला. जोरदार आवाज झाल्याने सर्वांनी मागे वळून पाहिले असता भयानक दृश्य दिसले.
तातडीने तिघांनाही उपचारासाठी एम्समध्ये (AIIMS) नेण्यात आले. डॉक्टरांनी गणेश पुंजरवार व देवकाबाई यांना मृत घोषित केले, तर सुधाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. नंदिनी सूरज गोरशेट्टीवार यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
आंबेडकर स्मारक आंदोलनातील कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू
दुसऱ्या घटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी अंबाझरी परिसरात गेल्या 22 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या अनंता राऊत यांचे रविवारी रात्री याच परिसरातच अपघाती निधन झाले. 20 जानेवारीपासून अंबाझरी परिसरात डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी नागपुरातील फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या परिवर्तनवादी महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनंता हा पहिल्या दिवसापासून सक्रिय सहभागी होता. आंदोलनाच्या ठिकाणी असणाऱ्या मांडवा समोरील रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने त्याला धडक दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. अनंता बहुजन समाज पार्टीत व आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय उपस्थिती दर्शविणारा कार्यकर्ता होता.
ही बातमी देखील वाचा...