(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : पोलिसांपासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून घेतली उडी, आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
अनेक गुन्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले फरार आरोपी वस्तीत वास्तव्यास असतानाही पोलिसांना वस्तीतील नागरिकांकडून विरोध असल्याने अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत.
Nagpur Crime News : गोवंश तस्करीत फरार असलेल्या एका आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी चक्क तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, ही उडी त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. यात गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील उप्पलवाडी परिसरात ही घटना घडली. इम्रान कुरैशी (वय 27, रा. उप्पलवाडी) असे मृताचे नाव आहे.
इम्रानविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल होता. देवलापार पोलिस ठाण्यातील पथक (Nagpur Police) त्याचा शोध घेत होते. तो उप्पलवाडीत लपला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पकडण्यासाठी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पोहोचले. पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेतले व त्याच्या घरावर धाड टाकण्याचे नियोजन केले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक उप्पलवाडीतील म्हाडा कॉलनीत पोहोचले. तो चौथ्या मजल्यावर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना पाहून त्याने उडी मारली.
संतप्त नागरिक अन् पोलिसांचे पथक परतले
पोलिसांच्या पथकाला पाहून आरोपीने खाली उडी घेतली. त्याला जबर दुखापत होऊन तो जखमी झाला असल्याचे पोलिसांना लक्षात आले. मात्र परिसरातील नागरिक संतप्त असल्याने पोलिसांचे पथक आल्यापावली परतले. मात्र आरोपीने उडी घेतल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता असा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. मात्र पोलिसांच्या पथकाने वरिष्ठांना दिलेले कारण बघता यावर वरिष्ठांकडून काय भूमिका घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वस्तीतील नागरिकांमुळे पोलिस कारवाईत अडथळा
शहरातील अनेक गुन्हेगारांवर कारवाई करुन त्यांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले फरार आरोपी वस्तीत वास्तव्यास असतानाही पोलिसांना वस्तीतील नागरिकांकडून विरोध असल्याने अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. तसेच पोलिस पथक येणार असल्याची माहिती मिळताच ते लपतात. तसेच त्यांच्या वस्तीतील नागरिक त्यांना मदत करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. यावर कठोर कारवाईसाठी वरिष्ठांकडून सहकार्य असल्यास अनेक गुन्हेगारांना जेरबंद करणे सहज शक्य असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पार्किंगच्या वादातून विद्यार्थ्यावर चाकूने वार
दुसऱ्या एका घटनेत नंदनवन (Nandanvan) परिसरात दुकानासमोर वाहन लावण्याच्या वादातून एकाने 19 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. प्रथम मनोज हाडके (वय 19, रा. हिवरीनगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथम काही सामान खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला. दरम्यान त्याने दुकानासमोर गाडी लावली. त्यावेळी उभा असलेला निखिल मेश्राम (वय 25) याने त्याला गाडी लावण्यास मनाई केली. सामान घेऊन दोन मिनिटांत येतो, असे सांगितल्यावरही निखिलची अरेरावी सुरुच होती. घटनास्थळी उपस्थितांनीही निखिलला शांत राहण्यास सांगितले. मात्र निखिलने चाकू काढून प्रथमवर वार केला. त्याच्या अंगठ्याला व पहिल्या बोटाला जखम झाली.