मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Malegaon Vote Jihad : मालेगावातील नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव व्होट जिहादचे (Malgaon Vote Jihad) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मालेगावातील नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या प्रकरणावरून अनेक धक्कादायक आरोप केले. लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Election 2024) मालेगावमध्ये व्होट जिहाद फंडिंग घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मालेगाव हे रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. मालेगावात 1500 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केलाय. आता यावरून धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव (Shobha Bacchav) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केलाय.
शोभा बच्छाव म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. मालेगावमध्ये 115 कोटी रुपये आले आणि लगेच काढले गेले, तेव्हा लोकसभा निवडणुका झालेल्या होत्या. हा पैसा कुठून आला याची सीबीआय चौकशी व्हावी. जनतेसमोर सत्य येईल, विनाकारण मालेगावची बदनामी करू नये. देशात असे पैसे कुठून-कुठून आले याचीही चौकशी व्हावी. मालेगावात रोहिंगे आणि बांगलादेशी नाहीत. मालेगावातील मुस्लिम बांधवांचा जन्म येथे झाला आहे. मालेगावात सुज्ञ नागरिक राहतात. बांगलादेशी व रोहिंगे यांना ते स्थान देणार नाहीत. तसे असल्यास प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे त्यांनी म्हटले.
व्होट जिहाद, लँड जिहाद हे भाजपाचे शब्द
त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाने देशात 400 पारचा नारा दिला होता. मात्र ते 240 वरच थांबले. विनाकारण मालेगावची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. देशात हिंदू, दलित आणि अल्पसंख्यांक यांना देखील बदनाम केले जात आहे. हे सर्व घटक महाविकास आघाडी आणि धर्मनिरपेक्षतेसोबत राहिले. मालेगावला देखील लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लिम बांधव महाविकास आघाडीबरोबर होते. मालेगाव मध्य क्षेत्रात गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यास भाजपाला 6000 पेक्षा जास्त मतदान मिळाले नाही. मात्र सेक्युलर उमेदवाराला लाखापेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. मला 1 लाख 98 हजार मतदान हे मालेगावमध्ये मिळाल्याचा मला अभिमान आहे. मालेगावसहित हिंदू मतदार संघामध्ये देखील काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढली आणि मतदार वाढले, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे व्होट जिहाद, लँड जिहाद हे भाजपाचे शब्द आहेत, तसे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा