HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
HMPV Virus : हा व्हायरस चीनमधून आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून हा व्हायरस आपल्या देशात आहे. त्यामुळे HMPV ला घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे डॉ. पल्लवी सापळे यांनी म्हटले आहे.
HMPV Virus : चीनमध्ये HNPV व्हायरस अत्यंत वेगाने पसरत असून यामुळे जगभरातील देशांची डोकेदुखी वाढली आहे. चीनच्या अनेक भागात परिस्थिती बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या व्हायरसची लागण होत आहे. तर महाराष्ट्रात देखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. नागपूरमधील सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. मात्र आता HNPV व्हायरसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग झाला असून या व्हायरसला घाबरण्याची अजिबात गरज नाही, अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, HMPV व्हायरस 2002-03 पासून भारतात आहे. 2022-23 मध्ये पुण्यातील 13 टक्के लहान मुलांना HMPV व्हायरसचा संसर्ग झाल्याचे रिसर्चमधून समोर आले आहे. HMPV व्हायरस चीनमधून आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून हा व्हायरस आपल्या देशात आहे. त्यामुळे HMPV व्हायरसला घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्यांनाच होते HMPV ची लागण
HMPV व्हायरस हा मुळात चीनमधून आलेला नाही. कोरोना व्हायरस हा नवीन वायरस होता. त्याच्यामुळे त्याला नोव्हेल कोरोना व्हायरस असं म्हटलं होतं. HMPV व्हायरस हा मागील 50-60 वर्षापासून जगभरात आहे. आपल्या देशात 2004 मध्ये पुण्यात हा व्हायरस आढळला होता. याबाबत 2011 मध्ये एम्समधून स्टडी पब्लिश झाली आहे. गेल्या वर्षीच पुण्याच्या केईएम रुग्णालयाचा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे. ज्यामध्ये 13 टक्के मुलांना एचएमपीव्ही व्हायरस झाल्याचे म्हटलेले आहे. हा व्हायरस जगात, देशात सगळीकडे आहे. मूल पाच वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांना याचा संपर्क येऊन गेलेला असतो. या काळात मुलाला रोगप्रतिकारक शक्ती आलेली असते. हा संसर्गजन्य रोग आहेच, पण हा रोग काही चीनमधून आलेला नाही आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांनाच तो होतो. हा आजार ज्येष्ठ नागरिकांना देखील होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना आणि एचएमपीव्हीमध्ये नेमका फरक काय?
कोरोना आणि एचएमपीव्हीमध्ये नेमका फरक काय? याबाबत देखील डॉ. पल्लवी सापळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनामध्ये कॉम्प्लिकेशन्स अधिक होती, रुग्णांचे व्हेंटिलेटरवर जाण्याचे प्रमाण जास्त होतं. कोरोनाच्या विविध लाटा यायच्या, म्हणजेच हा व्हायरस व्हायचा. कोरोनाचे लॉन्ग टर्म साईड इफेक्ट सुद्धा खूप होते. मात्र, एचएमपीव्ही हा संसर्गजन्य कमी आहे. सर्दी, ताप, खोकला हीच त्याची लक्षण आहेत. ज्यांना खूप जास्त त्रास होतो त्यांनी डॉक्टरकडे जावं. पण उपचार घेण्याचे प्रमाण याचं कमी आहे. एचएमटीव्हीचा संसर्ग झाला तर घरीच थांबावं. सर्दी, ताप, खोकल्याचा उपचार करावा. 2002-2003 पासून HMPV व्हायरस भारतात असल्याचे रिसर्चमधून समोर आले आहे. त्यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकी खबरदारी काय घ्यायची आहे ?
शिंकताना खोकताना तोंड झाकावे, जमेल तेव्हा हात धुवावे. कोरोनासाठी जे केलं तेच करायचं पण मास्क वगैरेची गरज नाही. मास्क फक्त त्यांनीच घालावा, ज्यांना लक्षण आहेत किंवा ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे, त्यांनी मास्क घालावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात एचएमपीव्हीच्या केसेस वाढल्या तर?
तपासण्या वाढवल्या की केसेस वाढतील, केसेस वाढल्या तरी घाबरण्याचा कारण नाही. केसेस तेवढ्याच असतील जेवढ्या मागच्या वर्षी होत्या.
एचएमपीव्हीच्या अनुषंगाने काही विशेष खबरदारी रुग्णालयात घेण्यात येते का?
सध्या काही विशेष खबरदारी घेण्याची गरज नाही. स्पेशल वॉर्डची सध्या गरज नाही. आकडा आम्ही मॉनिटर करत आहोत. जर व्हायरस बदलला तर किंवा तशा प्रकारचे निर्देश आले तर त्यानुसार आम्ही खबरदारी घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )