Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील चारचाकी वाहनधारकांच्यादृष्टीने मोठा निर्णय.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत. हा राज्यातील चारचाकी वाहनधारकांच्यादृष्टीने खूप मोठा निर्णय मानला जात आहे. 1 एप्रिल 2025 या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या दिवसापासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य असेल. या निर्णयामुळे वाहनधारकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे:
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
(मंगळवार, दि. 7 जानेवारी 2025)
1) शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-2014 मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य
2) महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)
- शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
- मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी
3) ई-कॅबिनेट सादरीकरण होणार, यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होणार, आजच्या सादरीकरणानंतर ई-कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होणार
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा झाल्यामुळे नेमकं काय होणार?
मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेटचे अधिकार, मंत्री परिषदचे अधिकार निश्चिती होणार. सोबतच विधानसभा कामकाज संदर्भात ही जबाबदारी निश्चित केली जाणार. विधान मंडळातील सादर करणाऱ्या विधेयकाची पद्धत ही निश्चित होणार. सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांची अधिकार कर्तव्य निश्चित होणार.
पालकमंत्रिपदाचा निर्णय नाहीच
प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय होईल, अशी चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत पालकमंत्रीपदाबाबत काहीच निर्णय झालेला नाही. पालकमंत्री पदावरुन खातेवाटप्रमाणेच शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होते. यंदा भाजपला संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी धरला असून याबाबत ठराव घेऊन पक्षश्रेष्ठींनादेखील साकडे घालण्यात आले आहे. त्यामुळे आता पालकमंत्रीपदाचा फैसला नेमका कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. सर्वात जास्त लक्ष बीडचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, याकडे लागले आहे.
आणखी वाचा
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय