Mission Ayodhya : मिशन अयोध्या! राम दर्शनासाठी भाजपचा मेगाप्लॅन तयार, काय आहे नियोजन?
Mission Ayodhya : अयोध्येमध्ये राम दर्शनासाठी भाजपकडून मिशन अयोध्येची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
नागपूर : राम जन्मभूमीच्या आंदोलनांनी राजकारणात भाजपच्या (BJP) प्रगतीचा आलेख हा कायमच चढता ठेवला. त्याच राम जन्मभूमीत आंदोलनाची पूर्तता होऊन रामलल्ला आपल्या भव्य राममंदिरात जाणार आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आता भाजपकडून राम भक्तांसाठी मेगाप्लॅन तयार करण्यात आलाय. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनानंतरही अनेक महिने तसेच सकारात्मक राजकीय वातावरण कायम ठेवण्याचं भाजपचं नियोजन आहे. भाजपचा अयोध्या मिशन हा मेगा प्लॅन नेमका आहे तरी काय त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
22 जानेवारीला रामलल्ला 500 वर्षानंतर आपल्या मंदिरात परतणार आहे. त्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची खास तयारी सुरु आहे. देशभर कोट्यवधी लोकांना अक्षदा देऊन निमंत्रण देण्यात आलंय. तसेच 23 जानेवारीनंतर राम दर्शनाला येण्याचा आग्रह देखील केला जातोय. त्याचवेळेस भाजपनेही राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून हजारो राम भक्तांना अयोध्येत नेऊन देशाचं राजकीय वातावरण राम मंदिराच्या उद्घाटनानंतरही राममय राहीय याची व्यवस्था सुरु केलीये.
भाजपचं "मिशन अयोध्या" कसं अमलात येईल?
आमदाराने त्यांच्या मतदारसंघातून 5 हजार तर खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातून 20 हजार राम भक्तांना अयोध्येत न्यायचे आहे. आमदार आणि खासदार यांच्या मदतीने जाणारे राम भक्त वेगवेगळे असणार आहे. म्हणजेच एका लोकसभा मतदारसंघातून 40 ते 50 हजार लोकं राम लल्लाचे दर्शन घेतील असे नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्यात. एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पुढील अनेक महिन्यात पार पाडली जाईल. त्यासाठी खास रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार असल्याची देखील देण्यात आलीये.
सध्या भाजपची ही योजना पक्षीय नियोजनाच्या स्तरावर आहे. त्यामुळे याबाबत भाजप आमदारांनी स्पष्टोक्ती केलेली नाही. तर नागपुरात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या मतदारसंघातून मोठ्या संख्येने लोकं अयोध्येत जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. तसेच नागपूर ते अयोध्या अशा विशेष रेल्वेची मागणी देखील त्यांनी यावेळी केलीये.
भाजपची संघटना रामभक्तांच्या वारीसाठी कामाला
भाजपची संघटना सुद्धा पडद्यामागून राम भक्तांच्या अयोध्या वारीसाठी कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप हे पक्ष म्हणून करत नाहीये, तर राम भक्तांची भावना लक्षात घेऊन त्यांच्या अयोध्या वारीसाठी मदत करण्याचे आमचे कर्तव्य आहे. लोकांच्या कामात मदत करणे ही आमच्या पक्षाची शिकवण असल्याने राम भक्तांच्या अयोध्या वारीसाठी मदत करण्याची आमची भूमिका असल्याचे मत भाजप प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी व्यक्त केले.
अयोध्येत राम भक्तांसाठी व्यवस्थेसाठीही प्रयत्न
राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पुढील काही महिने प्रत्येक मतदारसंघातून राम भक्तांची अयोध्या वारी सुरु राहील. अयोध्येत राम भक्तांसाठी निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यासाठी पक्षाच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल आणि काही महिने त्यांचा तेथेच मुक्काम असेल. अयोध्येत राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह अनेक भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते. अनेक दशके राम जन्मभूमीचे आंदोलन चालून न्यायालयीन लढ्यानंतर तिथे भव्य मंदिर साकारलं जातंय. विशेष म्हणजे या काळात भाजपची राजकीय प्रगतीचा आलेख नेहमी चढता राहिलाय.
1984 मध्ये विहिंप ने राम जन्मभूमीचे आंदोलन हाती घेतले. तेव्हा भाजपचे 2 खासदार होते, तर आज मंदिर आकारास येत असताना भाजपचे 303 खासदार आहेत. त्यामुळेच राम जन्मभूमीचे आंदोलन पूर्णत्वास जात असताना भाजप तसेच साकारात्मक राजकीय वातावरण अनेक महिने कायम राहील या दृष्टीने प्रत्येक मतदारसंघातील हजारो राम भक्तांना अयोध्येत नेण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा :