Nagpur Metro : विद्यार्थ्यांमधील नाराजीचा मेट्रोने घेतला धसका; आजपासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीटदरात 30 टक्के सवलत
बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रोपेक्षा स्वस्त ठरत असलेल्या खासगी वाहन, सिटी बस किंवा ऑटोचाच पर्याय निवडावा लागणार असल्याची स्थिती आहे.
Nagpur Metro News : नागपूर मेट्रोच्या चारही मार्गिका सुरु झाल्यावर मेट्रोने महिन्याभरात तब्बल चार वेळा तिकीट दरात वाढ केल्याने विद्यार्थी वर्गात नाराजीचा सूर असल्याचं चित्र असून मेट्रो व्यवस्थापनाने आता तिकीट दरात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (7 फेब्रुवारीपासून) मेट्रोने प्रवास करणाऱ्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीटदरात 30 टक्के सवलत देण्यात येत आहे. मात्र मेट्रोच्या प्रवाशांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नागपूर मेट्रोमध्ये आजपासून विद्यार्थ्यांना 30 टक्के सूट मिळत आहे. नागपूर मेट्रोच्या चारही मार्गांवर ही सूट मिळणार असून बाराव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे त्यावर्षीचे आयडी कार्ड दाखवावे लागणार आहे.
जानेवारी महिन्यात नागपूर मेट्रोने एकानंतर एक असं चार वेळेला भाडेवाढ केली. त्यामुळे नागपुरात खास करून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये मेट्रोबद्दल नाराजीचं वातावरण निर्माण झाला होता. शिवाय मेट्रोच्या प्रवासी संख्येतही कमालीची घट झाली होती. त्यामुळे मेट्रोने केलेली दरवाढ कमी करावी अशी मागणी सुरू झाली होती. मेट्रो प्रशासनाने जरी भाडे वाढ मागे घेतली नसली, तरी बाराव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये 30 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतल्याने मेट्रोच्या एकूण प्रवासी संख्येत सुमारे 25 टक्के वाटा असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तिकिटासाठी रोख किंवा महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो शालेय विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे 30 टक्के स्वस्त दरात मेट्रोतून शाळा, महाविद्यालयापर्यंतच नव्हे तर इतर भागातही प्रवास करता येणार आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रोने दिलासा दिला नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहन, सिटी बस किंवा ऑटोचाच पर्याय निवडावा लागणार असल्याची स्थिती आहे.
मेट्रो सिटीबस, ऑटोपेक्षाही महाग?
गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीची नागरिकांची मागणी होती. या मागणीवरून महामेट्रोने विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलत उपलब्ध करून दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फोटो असलेले ओळखपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. नागपूर मेट्रोतून विद्यार्थ्यांसह नागरिकांना नेहमीच सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि सहज प्रवासाची सेवा मिळत असून सवलतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास स्वस्त होणार आहे. मात्र दुसरीकडे महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सिटीबस, ऑटोचे दर नागपूर मेट्रोपेक्षा कमी असल्याने बचतीसाठी दुसरे पर्याय निवडावे लागणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अनेक मार्गावर नागपूर मेट्रोच्या तिकीटदरांपेक्षा सिटीबस आणि शेअरिंग ऑटोचे तिकीटदर निम्मे आहे.
ही बातमी देखील वाचा...