Nagpur Crime : अत्याचाराच्या घटनांनी उपराजधानी हादरली; आठवड्यात अनेक घटना उघड
गेल्या काही दिवसांत शहरात चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार अशा विविध घटना उघडकीस आल्या. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Nagpur Crime : आठवड्याभरात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विद्यार्थीनी, अल्पवीयन मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या. यात अल्पवयीन मुलगीवर सामूहिक अत्याचाराच्या घटनेने समाजमन सुन्न झालं. शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांतील पहिल्या घटनेत बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विश्वास विनोद समुद्रे (वय 20), असे आरोपीचे नाव आहे. संबंधित मुलगी त्याच्या ओळखीची होती. जून 2022 मध्ये तिच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत आरोपी विश्वासने तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली होती.
तीन वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य
प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुसऱ्या घटनेत मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने तीन वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. वेळेत हा प्रकार समोर आल्याने पुढील अनर्थ टळला. राजू देवचंद्र वघारे (वय 36) असे आरोपीचे नाव असून तो एका घरी भाड्याने राहतो. जवळच राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलगी खेळण्यासाठी येत होती. राजूने तिला मोबाइल दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलविले. मुलगी घरात येताच तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यामुळे मुलगी रडायला लागली. मुलीचा आवाज ऐकून बाजूच्या घरातील एक व्यक्ती आला व त्यांच्या हा प्रकार आला. त्यांनी राजूला हटकले व मुलीला तिच्या घरी पोहोचवले. या कालावधीत राजू फरार झाला. मुलीच्या वडिलांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी राजूविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
उड्डाणपुलाशेजारी उभी केली कार अन् केले अत्याचार
मार्गावरील उड्डाण पुलावरून खाली जाणाऱ्या रोडलगत कार उभी दोघांनी अल्पवयीन विद्यार्थीनीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. घर गाठताच तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला धीर देत पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि 363, 376 (2) (J), 376 (5), 323, 506, 34, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 कलम 4, 6 अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढत अटक केली. विशेष म्हणजे पिडीत मुलीच्या मैत्रिणीने दोन महिन्यांपूर्वी तिची त्या दोघांशी ओळख करून दिली होती. त्यामुळे ती त्यांच्या कारमध्ये बसायला तयार झाली. कार वेगळ्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच तिने प्रतिकार केला. मात्र, उपयोग झाला नाही. लैंगिक अत्याचार केल्यानंतर या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या दोघांनी तिला दिली.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
शाळा सुटल्यानंतर सावनेर शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने दोघांनी कारमध्ये बसविले आणि खापा कोदेगाव मार्गावर नेऊन तिच्यावर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला. यातील दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली आहे. अखिल ऊर्फ अक्की महादेव भोंग (वय 26. पंधराखेडी, सावनेर) आणि पवन विठ्ठल भासकवरे (वय 24, रा. मानेगाव, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी सावनेर शहरात राहत असून, ती शहरातील नगर परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकते. शाळा सुटल्यानंतर ती पायी घराकडे जाताना दोघेही एमएच-31/अ-4894 क्रमांकाच्या कारने शाळेजवळ आले. दोघांनीही तिला कारने घरी सोडून देण्याची बतावणी केली. दोघेही थोडेफार ओळखीचे असल्याने ती कारमध्ये बसली. त्यांनी कार वेगात सावनेर- खापा मार्गावरून खापा- कोदेगाव मार्गावर नेली व अत्याचार केला.
लग्नाच्या नावावर बलात्कार, गोळ्या देऊन गर्भपातही
लग्नाच्या बहाण्याने विद्यार्थिनीवर वर्षभरापासून बलात्कार करण्यात आला. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राजदीपसिंग सतनामसिंग सोहल (वय 22 रा. बन्सी नगर, हिंगणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजदीपसिंहला अटक करून दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी यांची शाळेपासून मैत्री आहे. दोघेही एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, राजदीपने तिला फेब्रुवारी 2012 मध्ये चिखलदरा येथे घेऊन गेला होता. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवत तीन दिवस जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तिच्यावर अनेकदा शारीरिक अत्याचार केले. घरी जाऊनही तो तिला त्रास देऊ लागला. महाविद्यालयात न गेल्यास विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान ती विद्यार्थिनी गरोदर राहिली व आरोपीने तिला गोळ्या देऊन जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. दबाव टाकून तिचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईक व मित्रमंडळींना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. हादरलेल्या विद्यार्थिनीने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बलात्कार, धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून राजदीपला अटक किली.
ही बातमी देखील वाचा...