Lok Sabha Election : भाजप युवा मोर्चाची तरुणाईला साद; दक्षिणेतील ‘सूर्या’ करणार तरुणाईला ‘तेजस्वी’
BJP : उपराजधानी नागपूरात 4 मार्चला विदर्भातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात भाजपच्या वतीने तरुणाई आणि नवमतदारांना विशेष साद घालण्यात येणार आहे.
Nagpur News नागपूर: लोकसभा निवडणुकींचा (Lok Sabha Election) शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून विरोधकांना ‘टोटल स्वाइप आऊट’ करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. भाजपने ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा देखील दिला आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने तरुणाई आणि नवमतदारांना विशेष साद घालण्यात येत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) हे युवा कार्यकर्त्यांना आणखी तेजपुंज करण्याच्या तयारीत आहेत. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी उपराजधानी नागपूरात(Nagpur News) सोमवार, 4 मार्चला विदर्भातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. राज्यभरातील एक लाख तरुण या संमेलनात सहभागी होतील, अशी अपेक्षा भजापच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यभरात 'नमो युवा चौपाल'चे आयोजन
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील तरुण मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे. तरुणाईने केलेल्या मताधिक्क्याच्या आधारावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमताची सरकार देशात स्थापन करता आले होते. त्या अनुषंगाने भाजप आपली संपूर्ण ताकद तरुणाई आणि नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लावतांना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजयुमोच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे 4 मार्च रोजी नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. नागपूरातील रविनगर येथील विद्यापीठाच्या मैदानात हे अधिवेशन होणार आहे. या महामेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख तरुण सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सोबतच हे अधिवेशन आटोपल्यावर राज्यभरातच 'नमो युवा चौपाल'चे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून 10 लाखांहून अधिक तरुणांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, सरचिटणीस आणि प्रभारी सुनील बन्सल हे देखील उपस्थित असणार आहे.
2024 च्या निवडणुकांसाठी तरुणांची गर्जना
नागपूरात 4 मार्चला होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी माहिती दिली की, 4 मार्च रोजी नागपुरात नमो युवा संमेलन घेतले जाणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवा इन्फ्लुएनसर्सला देखील आम्ही या संमेलनात निमंत्रित केले आहे. नागपूरात होत असलेले हे संमेलन म्हणजे 2024 च्या निवडणुकांसाठी तरुणांची गर्जना असणार आहे. 2014 आणि 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मोदींना जास्त प्रमाणात तरुणांचा पाठिंबा मिळणार आहे. पंतप्रधान मोदींना दोन वेळेला सत्ता सोपवण्यात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची महत्वाची भूमिका राहिली आहे. या कालावधी मध्ये मोदींनी देखील तरुणांचे स्वप्न पूर्ण करणारे धोरण राबवून देशाची आर्थिक प्रगती साधली आहे. त्यामुळे आज देशात गेल्या 50 वर्षातील सर्वात कमी बेरोजगारी आहे. आज भारत जगातील सर्वात तीव्रतेने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधानांनी देशातील 50 लाख नवीन तरुण मतदारांशी ऑनलाइन संपर्क साधला आहे. तसोबतच देशात 2 लाख ठिकाणी नमो युवा चौपाल होत असून प्रत्येक ठिकाणी 200 तरुणांना गोळा करून त्यांना 10 वर्ष केलेले काम सांगितले जात आहे. या प्रक्रियेतून तरुणांकडून येणार्या सूचना भाजप च्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जाणार असल्याचे देखील तेजस्वी सूर्या म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या