Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याला विलंब होण्याचं कारण सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी भाजप-सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपाचा दाखला दिला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खातेबदलासंदर्भातील पत्राला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत. माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेतल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्णय झाला त्यावेळीच खातं काढून घ्यायला पाहिजे होतं. मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही खातं काढून घेतलेलं आहे, आरोप झाले तरी मंत्र्यांवर कारवाई होत नाही, नवी प्रथा, नवा पायंडा सुरु झाला आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
Shashikant Shinde on Manikrao Kokate : शशिकांत शिंदे काय म्हणाले?
आतापर्यंत राजीनामे अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचे झालेले आहेत. भाजप- शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांवर आरोप होतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही. फक्त अजितदादा पवारांच्या गटाच्या मंत्र्यांवर कारवाई होते, असा एखादा विषय चर्चेला आला असेल त्यामुळं राजीनाम्याला विलंब झाला असेल, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
अंबादास दानवे काय म्हणाले?
खातं काढणं मोठं काम नाही. सरकार दोषी मंत्र्यांना पाठिशी घालतंय. लोकप्रतिनिधीत्व कायदा सांगतो न्यायालयानं दोषी धरलंय, त्यांना एक सेकंदही वैधानिक पदावर राहता येणार नाही. मंत्री तर बिल्कूल राहता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं सरकार दागी मंत्र्यांना सांभाळण्याचं काम करतंय काय असा सवाल अंबादास दानवे यांनी केला होता. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यावेळी लगेचच त्यांचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. गरिबांच्या सदनिका याच्यात गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालतंय, असं दिसतंय. खाती काढून चालणार नाही, राजीनामा झाला पाहिजे, सदस्यत्व रद्द झालं पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.
शिरसाठ यांच्या विकेटची वाट पाहतोय : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे, असं रोहित पवार म्हणाले. असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असं रोहित पवार म्हणाले.
























