Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
Pradnya Satav: राजकीय वर्तुळात आता प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे कोण आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, तर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर प्रज्ञा सातव यांना त्यांनी भाजपमध्ये घेतल्याची चर्चा आहेत.

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत असून, काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, हिंगोलीतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आज आमदारकीचा राजीनामा देणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता सभापतींकडे मागितली वेळ मागितली आहे. आज सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा ही आजच राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Pradnya Satav)
हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली गटबाजी, नेत्यांमधील संघर्ष आणि सलग निवडणुकांतील अपयशामुळे काँग्रेसची या मतदारसंघावरील पकड सैल झाल्याचं चित्र काही वर्षांपासून दिसून येत आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांना खासदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्यात राजीव सातव गट आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. या अंतर्गत वादाचा मोठा फटका पक्षाला बसल्याचे दिसून आलं. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केले.
Pradnya Satav: प्रवेशामागे अशोक चव्हाण असल्याच्या चर्चा
राजकीय वर्तुळात आता प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशामागे कोण आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, तर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर प्रज्ञा सातव यांना त्यांनी भाजपमध्ये घेतल्याची चर्चा आहेत. सातव यांनी भाजपमध्ये यावे, कोणी प्रयत्न केले, यावरून बरीच नावे पुढे केली येत आहेत.
Who is Pradnya Satav: कोण आहेत प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.
राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली होती.
Pradnya Satav: प्रज्ञा सातव यांच्यासह आणखी एक आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश?
प्रज्ञा सातव यांच्यासह आणखी एक आमदाराचा भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराच्या नावाच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहेत. भाजप महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचं संभाव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुणे, सोलापुरातील देखील काही महत्त्वाचे पक्षप्रवेश भाजपात आज होणार असल्याची माहिती आहे.























