Malnutrition : कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ, ऑगस्ट अखेरपर्यंत 1117 मुलांची नोंद
हिंगणा तालुक्यात सर्वाधिक 192 बालके या प्रवर्गात आढळून आले. ही बाब महिला व बालकल्याण विभागाच्या कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. सावनेर आणि रामटेक तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे.
नागपूरः कुपोषणमुक्तीसाठी (Malnutrition free) शासनाकडून कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. पोषण आहार योजना वर्षानुवर्षे सुरू आहे. अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर महिलांपासून ते नवजात बालकांच्या पोषक आहार व औषधांवर खर्च केला जात आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील (Nagpur District) दुर्गम ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्यात 1,117 कुपोषित बालके आढळून आली. त्यात 933 मध्यम तीव्र कुपोषित आणि 184 तीव्र कुपोषित बालकांचा समावेश आहे.
हिंगणा तालुका 'टॉप'वर
हिंगणा तालुक्यात (Hingna) सर्वाधिक 192 बालके या प्रवर्गात आढळून आले. ही चिंताजनक बाब असून महिला व बालकल्याण विभागाच्या कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, सावनेर (Savner) आणि रामटेक (Ramtek) तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. मात्र, या मुलांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारेल, असा विश्वास विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केला.
अंगणवाडीत 1.40 लाख बालके
जिल्ह्यात एकूण 2,161अंगणवाड्या (Anganwadi) आणि 262 मिनी अंगणवाड्या आहेत. तिथे 1.40 लाख मुलांना नर्सरीपूर्व शिक्षण तसेच पोषण आहार दिला जातो. आदिवासी व दुर्गम भागातील नवजात व लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने पोषण आहार योजना सुरू केली आहे. या मुलांना ग्राम बाल विकास केंद्रामार्फत एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड दिले जाते. कोरोनाच्या काळात अंगणवाड्या सुमारे 2 वर्षे बंद होत्या, परंतु मुलांना पोषण आहाराच्या स्वरूपात अन्नधान्य इत्यादी घरपोच दिले गेले खरे, पण त्याचा उपयोगच केला गेला नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे मानले जात आहे.
4 तालुक्यांमध्ये अधिक प्रमाण
जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये अधिक कुपोषित बालके आढळून आली आहेत. यामध्ये हिंगणा 192, नागपूर ग्रामीणमधील 153 मुलांचा समावेश आहे. सावनेर आणि रामटेक तालुक्यांच्या दुर्गम आदिवासी भागात, मध्यम तीव्र आणि गंभीर श्रेणीतील अनुक्रमे 126 आणि 119 मुले कुपोषित आढळून आली आहेत. या मुलांवर विशेष लक्ष दिले जात असून लवकरच परिस्थिती सुधारेल, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या