(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : भारतात घुसखोरी करुन 50 हून बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत, बनावट दस्तावेजाचा वापर; नागपुरातून एका मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक
Nagpur News : बांगलादेशींंना बनावट दस्तावेज बनवून भारतात घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या घुसखोरीच्या एका मास्टरमाइंडला एटीएसने नागपुरातून अटक केली आहे.
Nagpur ATS Action : बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. बांगलादेशींंना बनावट दस्तावेज बनवून भारतात घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या घुसखोरीच्या एका मास्टरमाइंडला एटीएसने नागपुरातून अटक केली आहे. या आरोपीने आधी स्वत: भारतात घुसखोरी केली. त्यानंतर तो इतर बांगलादेशींना घुसखोरी करण्यास मदत करत होता. आधी बांगलादेशातून भारतात घुसखोरी, नंतर नागपुरात राहून 50 पेक्षा जास्त बांगलादेशींसाठी महत्त्वाचे दस्तावेज बनवून त्यांच्या भारतातील घुसखोरीत मदत केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरातून घुसखोरीच्या मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.
घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला एटीएसकडून अटक
बांगलादेशमधून बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला एटीएस आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. पलाश बिपन बरुआ असे अटक करण्यात आलेले 40 वर्षीय बांगलादेशी नागरिकाचं नाव आहे.
बौद्ध भिख्खूच्या वेशात सीमा ओलांडून भारतात
पलाश सुमारे दहा वर्षांपूर्वी बौद्ध भिख्खूच्या वेशात बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात शिरला होता. सुरुवातीला 3 ते 4 वर्ष तो नागपुरात बौद्ध भिख्खूच्या स्वरूपात विविध बौद्ध विहारांमध्ये राहिला आणि त्यानंतर गेले अनेक वर्ष तो नागपुरात सामान्य नागरिकासारखा आयुष्य जगत होता आणि जिम ट्रेनरची नोकरी करत होता.
भारतात घुसखोरीचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता
धक्कादायक बाब म्हणजे पलाशने फक्त स्वतःसाठीच भारतामध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेली नाही. तर, तो इतर अनेक बांगलादेशी नागरिकांसाठी नागपुरातून आधार कार्ड आणि पासपोर्ट सारखे दस्तावेज बनवण्यात यशस्वी ठरला होता. त्याने बनवून दिलेल्या दस्तावेजांच्या माध्यमातून अनेक बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली असून त्यापैकी काहीजण देशातील इतर मोठ्या शहरात राहत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पलाशच्या चौकशीतून भारतात घुसखोरीचं एक मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
भारतात घुसखोरीच्या घटना वाढत्या
अलिकडच्या काळात सीमेवरील अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बांगलादेश, पाकिस्तान यासोबतच काही चीनी नागरिकांनी ही अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. यामुळे भारताच्या सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीमेपलिकडच्या प्रेमकहाण्याही तुफान चर्चेत आहेत. प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातूनही प्रेमासाठी भारतात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :