(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोशल मीडियावर मविआच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर, नागपुरात सात जणांविरोधात गुन्हा दाखल
गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राचे राजकारण' या फेसबुक पेजवर तसंच त्याच्याशी संबंधित ट्विटर आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन टीकाटिप्पणी केली जात आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर नागपूरमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महाविकास आघाडी सरकारच्या काही वरिष्ठ नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन त्यांची बदनामी करणाऱ्या सात जणांविरोधात शिवसेनेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेच्या या तक्रारीनंतर नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आयटी ॲक्ट अंतर्गत या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचा आरोप आहे की गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राचे राजकारण' या फेसबुक पेजवर तसंच त्याच्याशी संबंधित ट्विटर आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन टीकाटिप्पणी केली जात आहे. नागपुरातील शिवसेना नेत्यांनी या सर्व सोशल मीडियाच्या संदर्भात आवश्यक फोटो, स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावेही पोलिसांकडे दिले आहे. पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र हे फेसबुक पेज कोण चालवत आहे याचा उलगडा अजून झालेला नाही.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी नागपुरातील शिवसेना नेत्यांनी समित ठक्कर नावाच्या तरुणाविरोधातही ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नागपूर आणि मुंबई पोलिसांनी समित ठक्करला अटक करत कारवाई केली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. अनेक दिवस पोलिसांच्या कोठडीत राहिल्यानंतर समित ठक्करला जामीन मिळाला होता. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि कोणाला अटक होते हे लवकरच स्पष्ट होईल.